मढी देवस्थान परिसर भाविकांनी फुलू लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:37 IST2021-02-06T04:37:51+5:302021-02-06T04:37:51+5:30
तिसगाव : शासनाने मंदिर खुले करण्यास परवानगी दिल्यानंतर श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे गेल्या काही दिवसात भाविकांची वर्दळ ...

मढी देवस्थान परिसर भाविकांनी फुलू लागला
तिसगाव : शासनाने मंदिर खुले करण्यास परवानगी दिल्यानंतर श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे गेल्या काही दिवसात भाविकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. येथील व्यावसायिकांवरील मंदीची छायाही हटू लागली असून बाजारपेठ पुन्हा गजबजली आहे.
देवस्थान समितीचे एकूण नऊ गाळ्यात पूजाविधी व पूरक साहित्य विकणारे व्यावसायिक आहेत. त्यांनाही दिलासा मिळत आहे. देवस्थानमध्ये पुजारी, वाहन चालक, आचारी, सुरक्षारक्षक असे मिळून असलेल्या १८ कर्मचाऱ्यांची नैमित्तिक कामे सुरू झाली आहेत. कानिफनाथ गडाचे भोवतीच मढी गाव गोलाकार वसले आहे. आपेश्वर मंदिर, ऐतिहासिक बारवा, पवनागिरी नदी किनारीचे मायंबा मंदिर, अशी पौराणिक महतीची स्थळे गावकुसाला आहेत. या गोलाकार प्रदक्षिणा मार्गावर स्थानिक ग्रामस्थांची किराणा, कापड, हार, पूजा साहित्य विक्रीची दुकाने, उपहारगृहे, विश्रामगृहे अशा दालनांचे जाळे आहे.
अमावास्या, पौर्णिमा, शुक्रवार अशा पर्वणी काळ निमित्त हा सर्व परिसर भाविकांचे गर्दीने फुलू लागला आहे. प्रति महिना सव्वा कोटींची आर्थिक उलाढाल असलेली ही बाजारपेठ अक्षरशः थंडावली होती. दीड महिन्यांपासून मात्र विस्कळीत जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे.
---
विश्वस्त मंडळाने पदभार घेऊन दोन महिने होत आहेत. दूरवरून येणाऱ्या भाविकांची अडचण लक्षात घेऊन ३ फेब्रुवारीपासून सामाजिक अंतराचे व सार्वजनिक स्वच्छतेचे भान ठेवून अन्न छात्रालय सुरू केले आहे. महिन्याला उघडण्यात येणाऱ्या दक्षिणा पेटीतील दान रक्कम लॉकडाऊनचे अगोदरप्रमाणेच आहेत. विकास कामे याच महिन्यात आरंभ करू.
-संजय मरकड,
अध्यक्ष, कानिफनाथ देवस्थान
---
निवडुंगे, धामणगाव देवीचे, तिसगाव येथून मढी गावी जाणाऱ्या जोड रस्त्यावरील शीतगृहे, अल्पोपाहार केंद्रे व हॉटेल व्यवसाय खऱ्या अर्थाने देवस्थळी होणाऱ्या भाविकांच्या गर्दीनंतर सुरू झाले आहेत. बऱ्याच काळानंतरचा हा दिलासा आहे.
-बाबासाहेब बुधवंत,
हॉटेल व्यावसायिक