राहात्याचा विकास आराखडा लवकरच
By Admin | Updated: August 12, 2014 23:19 IST2014-08-12T23:10:28+5:302014-08-12T23:19:35+5:30
बाभळेश्वर : राहाता शहराचा विकास आराखडा तयार करण्याची संधी प्राप्त झाली असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

राहात्याचा विकास आराखडा लवकरच
बाभळेश्वर : लोकांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने शिर्डी विकास प्राधिकरण रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने राहाता शहराचा विकास आराखडा तयार करण्याची संधी प्राप्त झाली असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.
तलाठी व मंडल कार्यालयाचा भूमिपूजन समारंभ विखे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. नगराध्यक्षा लताताई मेहेत्रे, उपनगराध्यक्ष संजय सदाफळ, प्रांताधिकारी कुंदन सोनवणे, तहसीलदार सुभाष दळवी, सभापती निवास त्रिभुवन, उपसभापती सुभाष विखे, मारूतराव गिधाड, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, अॅड. रघुनाथ बोठे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
विखे म्हणाले की, तलाठी आणि मंडल कार्यालयात आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून संगणकीकृत दाखले देण्यास प्रारंभ करावा. राहात्याचा नवीन विकास आराखडा आता तयार करण्याची गरज निर्माण झाली असून, शिर्डी विकास प्राधिकरण शासनाने रद्द केल्याने हा विकास आराखडा नव्या स्वरुपात तयार करण्याची संधी आली आहे. विकासाच्या मुलभूत संकल्पना डोळ्यासमोर ठेवून हा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने नगरपालिकेने पुढाकार घ्यावा, असे सांगतानाच, शहराला वैभव प्राप्त करून देणारे नाट्यगृह बांधण्याचा संकल्पही विखे यांनी बोलून दाखविला.
दारणा धरणाच्या आवर्तनाबाबत जलसंपदामंत्र्यांशी चर्चा करून, आपण खरीपाला पाण्याचे एक आवर्तन तातडीने देण्याबाबतची मागणी केली आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय होईल, असे विखे यांनी सांगितले. यावेळी रघुनाथ बोठे, तहसीलदार सुभाष दळवी आदींची भाषणे झाली. महसूल विभागातर्फे विखे यांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)