पाणी असूनही तिसगावकरांना निर्जळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:36 IST2020-12-13T04:36:22+5:302020-12-13T04:36:22+5:30
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक मुख्य पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. या पाणी गळतीकडे ग्रामपंचायतच्या ...

पाणी असूनही तिसगावकरांना निर्जळी
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक मुख्य पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. या पाणी गळतीकडे ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांसह सत्ताधारी गटाचेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तिसगावकरांना पाणी उपलब्ध असूनही टंचाईचा सामना करावा लागत आहे, असा आरोप ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार लोखंडे यांनी केला आहे.
लोखंडे म्हणाले, ग्रामपंचायतीच्या साठवण टाकीजवळ मुख्य पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. ही पाईपलाईन अनेक दिवसांपासून फुटलेली आहे. परंतु, ग्रामपंचायत कर्मचारी व सत्ताधारी गटाच्या दुर्लक्षामुळे पाणी उपलब्ध असतानाही टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाचीआंबा पाझर तलावात वांबोरी चारीचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे या तलावात जवळपास पन्नास टक्क्यांपर्यंत पाणीसाठा आहे. तरीही सत्ताधाऱ्यांकडून योग्य नियोजन केले जात नसल्यामुळे आजही गावकऱ्यांना एक महिन्याला सार्वजनिक नळाला पाणी सोडण्यात येत आहे. पाईपलाईन दुरुस्त न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा लोखंडे यांनी दिला आहे.
----
पाचीआंबा पाझर तलावात समाधानकारक पाणीसाठा असून तलावाखाली असलेली ग्रामपंचायतीची विहीरही तुडुंब भरली आहे. तरीही तिसगावकरांना महिनाभराने पाणी सोडले जात आहे.
-फिरोज पठाण,
उपसरपंच, तिसगाव