सुपा औद्योगिक पार्कचा आराखडा पुणे विभागाकडे
By Admin | Updated: July 31, 2014 00:40 IST2014-07-30T23:30:52+5:302014-07-31T00:40:23+5:30
अहमदनगर : सुपा- पारनेर औद्योगिक पार्क उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे़

सुपा औद्योगिक पार्कचा आराखडा पुणे विभागाकडे
अहमदनगर : सुपा- पारनेर औद्योगिक पार्क उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे़ नव्याने उभारण्यात येणाऱ्या पार्कमधील पायाभूत सुविधांच्या आराखड्यास नाशिक विभागाकडून बुधवारी मंजुरी देण्यात आली असून, अंतिम मंजुरीसाठी तो पुणे विभागाकडे पाठविला जाणार आहे़ त्यामुळे सुपा औद्योेगिक विकासाला चालना मिळेल़
सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरण करण्यात येत आहे़ औद्योगिक विकास महामंडळाने सप्टेंबर २०१० मध्ये बाबुर्डीसह सहा गावांतील जमिनी संपादन करण्याचा निर्णय जाहीर केला़ प्रशासनाच्या या निर्णयामुळे सहा गावांतील नव्याने ९२७ हेक्टर जमीन उपलब्ध होऊ शकणार आहे़ ती ताब्यात घेण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे़ श्रीगोंदा -पारनेर उपविभागीय कार्यालयाकडून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ यापैकी ५०० एकर जमिनी जपानी उद्योगासाठी देण्याचे ठरले आहे़ जिल्ह्यात प्रथमच जपानी उद्योग येत असून, या उद्योगांसाठी स्वतंत्र पार्क उभारण्यात येणार आहे़ त्यासाठीची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे़ पार्कचा २५० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे़ येथील उपविभागीय कार्यालयाकडून तो बुधवारी नाशिक येथे झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला़ किरकोळ सुधारणा करत कार्यकारी अभियंत्यांनी त्यास मंजुरी दिली असून, अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव आता पुणे विभागीय कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे़
जिल्ह्यात लघु व मध्यम उद्योगांची संख्या मोठी आहे़परंतु मोठे उद्योग नसल्याने ते अडचणीत आले आहेत़ त्यामुळे नगर शहरासह जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीवर मंदीचे सावट पसरले आहे़ या उद्योजकांवर उत्पादन कमी करण्याची वेळ ओढावली आहे़ अर्थिक संकटात सापडलेल्या लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळावी, यासाठी सुपा औद्योगिक वसाहतीत मोठे उद्योग आणण्याचा प्रयत्न सुरू आहे़ वरिष्ठस्तरावर याबाबत बैठका सुरू असून, उद्योजकांशी चर्चा सुरू आहे़ सुपा येथे मोठे उद्योग आल्यास येथील लघु व मध्यम उद्योजकांना मोठ्याप्रमाणात काम मिळेल,अशी अपेक्षा उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे़ सुपा येथील पार्कचा आराखडा मंजूर होऊन प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ उद्योगक्षेत्राला चालना देणारा हा प्रस्ताव असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून सांगण्यात आले़
(प्रतिनिधी)
सुपा-पारनेर औद्योगिक पार्कचा तयार केलेला आराखडा नाशिक विभागास सादर करण्यात आला़ त्यावर सकारात्मक चर्चा होऊन आराखडा पुणे विभागाकडे सादर केला जाणार आहे़
-रमेश गुंड,
उपअभियंता