नवीन वर्षात होणार लोकशाही दिन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:45 IST2020-12-17T04:45:38+5:302020-12-17T04:45:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या मार्चपासून लोकशाही दिनाचे पुन्हा आयोजन करण्याचा आदेश सामान्य ...

नवीन वर्षात होणार लोकशाही दिन सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या मार्चपासून लोकशाही दिनाचे पुन्हा आयोजन करण्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे. त्यामुळे तालुका, जिल्हा, विभागीय आयुक्त आणि मंत्रालयस्तरावर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. नव्या वर्षात पुन्हा लोकशाही दिन सुरू होणार असल्याने नागरिकांच्याही तक्रारी निकाली निघणार आहेत.
नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा व्हावा यासाठी महिन्याच्या पहिल्या सोमवारी तालुका, जिल्हा मुख्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय आणि मंत्रालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकशाही दिन साजरा होत असे. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण १२ मार्च रोजी सापडला होता. कोराेनाचा रुग्ण सापडल्याने शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोकशाही दिनही रद्द करण्यात आला होता. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून सरकारी कार्यालयांत लाेकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले नव्हते. लोकशाही दिनात नागरिकांच्या तक्रारींवर चर्चा होऊन तक्रार निकाली काढली जाते; परंतु गेल्या सहा महिन्यांपासून आलेल्या तक्रारींवर कार्यवाही झाली नाही. प्रशासनाकडून कार्यवाही न झाल्यास न्याय कुठे मागायचा, असा प्रश्न होता; परंतु आता शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानेच तालुकास्तरावर, जिल्हास्तरावर आणि महापालिकेला पूर्वीप्रमाणे लोकशाही दिन आयोजित करण्याचा आदेश दिला आहे. स्थानिक परिस्थिती पाहून लोकशाही दिनाबाबत निर्णय घेण्याची मुभा सरकारी कार्यालयांना देण्यात आली आहे. लोकशाही दिनात किती तक्रारी येतात, उपस्थिती किती असेल, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
....
पहिल्या सोमवारची परंपरा कायम
जिल्हा मुख्यालयासह तालुकास्तरावर नगरपालिका व महापालिकांमध्ये नेहमीप्रमाणे महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनीही न्याय मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.