साडेतीन हजार हेक्टरसाठीच पाण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST2020-12-15T04:36:43+5:302020-12-15T04:36:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामात पाटबंधारे विभागाकडे ३ हजार ५८० हेक्टरसाठीच पाण्याची मागणी ...

Demand for water only for three and a half thousand hectares | साडेतीन हजार हेक्टरसाठीच पाण्याची मागणी

साडेतीन हजार हेक्टरसाठीच पाण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामात पाटबंधारे विभागाकडे ३ हजार ५८० हेक्टरसाठीच पाण्याची मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत ही सर्वात कमी मागणी असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

गोदावरीच्या कालव्याद्वारे शेतीला, पिण्याला पाणी देण्यासाठी नांदूर मधमेश्वर धरणातून डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे कोपरगाव, राहाता तालुक्यांत पाणी आणले जाते. त्यावेळी डाव्या कालव्यावरील १७ हजार ५४० हेक्टर क्षेत्र तर उजव्या कालव्यावरील २३ हजार ३६५ हेक्टर क्षेत्र असे एकूण ४० हजार ९०५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली होते; परंतु गेल्या अनेक वर्षांत ७ क्रमांकाचे अर्ज भरण्याचे प्रमाण कमी होऊ लागले. त्यामुळे सातत्याने पाण्याची मागणी कमी होऊ लागली. शिल्लक पाण्यावर पिण्याच्या पाण्याचे आरक्षण पडू लागले. यंदा १० डिसेंबर २०२० पर्यंत ७ नंबर अर्ज भरण्यासाठी मुदत होती. याकालावधीत डाव्या कालव्यावर ७ नंबर अर्जावर ९३० हेक्टर व पाणी वापर संस्थांचे ८५० हेक्टर असे मिळून १ हजार ७८० हेक्टर व उजव्या कालव्यावर फक्त मागणी अर्जावर १ हजार ८०० हेक्टर असे ३ हजार ५८० हेक्टरसाठी पाण्याची मागणी झाली आहे.

...........

कारखाने पुढाकार का घेत नाहीत ?

कोपरगाव तालुक्यातील साखर कारखान्यांचा कारभार हाकणारी नेतेमंडळी अगदीच तालुक्यातील नवीन मतदार नोंदणीपासून सोसायटी, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद तर थेट आमदारकीच्या निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी कारखानाच्या कामगारांची यंत्रणा वापरतात. मग शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या पाट पाण्याचे मागणी अर्ज भरण्यासाठी ही यंत्रणा का वापरत नाहीत. निव्वळ अर्ज भरण्याचे पोकळ आवाहन करण्यासाठी मात्र, ही नेतेमंडळी पुढाकार घेतात, अशी तालुक्यातील शेतकरी वर्गात चर्चा सुरू आहे.

...........

फक्त उन्हाळी हंगामातील आवर्तनासाठी सभासदांचे ७ नंबर अर्ज कारखान्यामार्फत भरून शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून पाणीपट्टीची रक्कम वजा करून पाटबंधारे विभागास ही रक्कम भरण्यात येते.

- शिवाजीराव दिवटे, सरव्यवस्थापक, सहकार महर्षी कोल्हे साखर कारखाना, कोपरगाव.

............

शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागातील ७ नंबर अर्ज भरण्यासाठी कोणत्याही हंगामात कारखान्यामार्फत कोणतीही मदत केली जात नाही.

- गिरीश जगताप, कार्यकारी संचालक, कर्मवीर काळे साखर कारखाना, कोळपेवाडी.

Web Title: Demand for water only for three and a half thousand hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.