जिल्ह्यात रेमडेसिवीरची मागणी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:36 IST2020-12-16T04:36:16+5:302020-12-16T04:36:16+5:30

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच गंभीर रुग्णांचीही संख्या कमी झाल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी ७५ ...

The demand for remedicivir decreased in the district | जिल्ह्यात रेमडेसिवीरची मागणी घटली

जिल्ह्यात रेमडेसिवीरची मागणी घटली

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच गंभीर रुग्णांचीही संख्या कमी झाल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी ७५ टक्के घटली आहे. खासगी रुग्णालये, औषध विक्रेते आणि जिल्हा रुग्णालयातही रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन दिवसांत १३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे गंभीर रुग्णांची संख्या वाढली तर ऐनवेळी धावपळ नको म्हणून जिल्हा रुग्णालयाने चार ते पाच हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या निम्म्यापेक्षा कमी झाली आहे. सध्या १२०० ते १३०० जणांवरच उपचार सुरू आहेत. ऑगस्ट- सप्टेंबरपर्यंत रोज तीनशेपेक्षा जास्त जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येत होती. आता ही संख्या १५० ते १७५ पर्यंत कमी झाली आहे. तसेच दरदिवशी कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. मात्र, आठवड्यातून एखाद्या दिवशी १० ते १५ जणांचा मृत्यू होत असल्याने अद्यापही कोरोनाची गंभीरता टळलेली दिसत नाही. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना दिले जात आहेत. मात्र, पूर्वीपेक्षा ७५ टक्क्यांनी ही मागणी कमी झाल्याचे केमिस्ट असोसिएशन व जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. रुग्ण पॉझिटिव्ह आले तरी शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्याऐवजी घरामध्येच विलगीकरणात राहत आहेत. गंभीर असेल तरच रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याचे चित्र आहे.

-----------

रेमडेसिवीर इंजेक्शनची नगरमधील स्थिती

पूर्वीची रोजची मागणी- ३५०० ते ४०००

सध्याची रोजची मागणी- २०० ते ३००

------------

दोन- तीन महिन्यांपूर्वी रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठी मागणी होती आणि पुरवठा कमी होता. त्यातुलनेत सध्या २५ टक्क्यांपेक्षाही कमी मागणी आहे. सर्व औषधी दुकानांमध्ये इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सध्या एका कोविड सेंटरमधून ७ ते ८ इंजेक्शनची मागणी होते. जे रुग्ण गंभीर आहेत, अशाच रुग्णांना रेमडेसिवीर दिले जात असल्याने बाजारातही इंजेक्शनची अजिबात टंचाई नाही.

- दत्ता गाडळकर, अध्यक्ष, केमिस्ट असोसिएशन

--------------

जिल्हा रुग्णालयात पुरेसा साठा

जिल्हा रुग्णालयात सध्या ७०० ते ८०० रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे, जो गंभीर रुग्णांसाठी वापरला जातो. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी इंजेक्शनची मागणी आहे. त्यामुळे आणखी ४५०० इंजेक्शनची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामध्ये गत आठवड्यात २५०० इंजेक्शन मिळाले असून दोन हजार इंजेक्शनची प्रतीक्षा आहे, असे जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयातही रोज रुग्णांसाठी ३० ते ४० इंजेक्शनची गरज भासते.

---

डमी वापरावी

Web Title: The demand for remedicivir decreased in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.