दिल्लीच्या ठगाकडून महाराष्ट्रातील ५० जणांची फसवणूक; नगरच्या सायबर पोलिसांकडून अरोरा याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 19:37 IST2018-01-09T19:34:37+5:302018-01-09T19:37:38+5:30
नोकरीच्या आमिषाने दिल्ली येथील हिमांशू रवी अरोरा याने महाराष्ट्रातील तब्बल ५० जणांची आॅनलाइन फसवणूक केल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या रॅकेटमध्ये आठ जण कार्यरत आहेत.

दिल्लीच्या ठगाकडून महाराष्ट्रातील ५० जणांची फसवणूक; नगरच्या सायबर पोलिसांकडून अरोरा याला अटक
अहमदनगर : नोकरीच्या आमिषाने दिल्ली येथील हिमांशू रवी अरोरा याने महाराष्ट्रातील तब्बल ५० जणांची आॅनलाइन फसवणूक केल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या रॅकेटमध्ये आठ जण कार्यरत असून, नवी दिल्लीत एक कॉलसेंटरच्या माध्यमातून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना हे गुन्हेगार लक्ष करत आहेत.
नगर शहरातील बुरुडगाव रोड येथे राहणारा रोहित राजेंद्र गुंदेचा या तरुणाची नोकरीचे आमिष दाखवून २३ आॅक्टोबर २०१७ रोजी हिमांशू अरोरा आणि त्याचे साथीदार दसविंदर सिंग व विपुल नावाच्या व्यक्तीने ६८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली़ या प्रकरणी गुंदेचा याने २ जानेवारी रोजी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पवार व त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून तीन दिवसांत नवी दिल्ली येथून हिमांशी अरोरा याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, नोकरीचे आमिष दाखवून त्याने महाराष्ट्रातीलच ५० जणांची अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचे सांगितले़ न्यायालयाने आरोपीला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. नगरचे सायबर पोलीस या रॅकेटमधील इतर सात आरोपींच्या शोधात आहेत.
श्रीरामपूरच्या तरुणालाही २५ हजारांचा गंडा
हिमांशी अरोरा व त्याच्या साथीदारांनी श्रीरामपूर येथील विवेक कचेश्वर जठार (वय २२) या तरुणालाही नोकरीचे आमिष दाखवून आॅनलाइन पद्धतीने त्याच्या बँक खात्यातील २५ हजार रुपये काढून घेतले़ याबाबत जठार याने सायबर पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दाखल केली आहे.
नोकरी डॉटकॉमवरून तरुणांची माहिती
नोकरीच्या शोधात असलेले बहुतांशी सुशिक्षित तरुण ‘नोकरी डॉटकॉम’ या वेबसाइटवर आपली वैयक्तिक माहिती भरून बायोडाटा अॅपलोड करतात. हिमांशी अरोरा व त्याच्या साथीदारांनी नोकरी डॉटकॉमवरूनच तरुणांची माहिती घेऊन त्यांची फसवणूक करतात. नोकरी डॉटकॉम पेल्समेंटमधून बोलत असल्याचे सांगत नोकरी हवी आहे का, अशी विचारणा केली जाते. त्यानंतर रजिस्ट्रेशन फी म्हणून १०० रुपये भरण्यास सांगितले जाते. यावेळी संबंधिताकडून बँकेचा ओटीपी घेऊन त्याच्या खात्यातील रक्कम आरोपीच्या वॉलेटमध्ये वर्ग करून घेतात.