आबांना हटवा
By Admin | Updated: June 25, 2014 00:30 IST2014-06-24T23:32:21+5:302014-06-25T00:30:24+5:30
अहमदनगर : राज्यात दलित, मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. आरोपींना शिक्षा लागण्यासाठी आवश्यक असलेल्या तपास कामात पोलीस निष्क्रियता दाखवित आहेत.

आबांना हटवा
अहमदनगर : राज्यात दलित, मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. आरोपींना शिक्षा लागण्यासाठी आवश्यक असलेल्या तपास कामात पोलीस निष्क्रियता दाखवित आहेत. पोलिसांकडूनच आरोपींना संरक्षण मिळत आहे. पोलीस खात्यावर गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा कोणताही वचक राहिलेला नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तातडीने आर. आर. पाटील यांना हटवून त्यांच्या जागी दुसरा सक्षम गृहमंत्री नियुक्त करावा, अशी मागणीच काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी पत्रकार परिषदेत केली.
दलवाई म्हणाले, खर्डा, सोनई, आष्टी, पुणे आदी ठिकाणी दलित, मुस्लिमांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये झालेल्या हत्या अमानुषपणे करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी योग्य तपास करून आरोपींना शिक्षा होईल, अशा पद्धतीने वकिलांना माहिती देणे अपेक्षित आहे. मात्र पोलीस या कामी निष्क्रिय झाले आहेत. ते नेमके कोणाचे काम करतात, असा संशय आहे. पोलिसांचा समाजावर वचक राहिलेला नाही. पोलीस यंत्रणाच सुस्त झाली आहे. पोलीस खात्यावर आर. आर. पाटील यांचा वचक राहिलेला नाही. पोलिसांवर आबांचा प्रभावही पडत नाही. गतिमान पद्धतीने तपास होऊन शिक्षा झाली तरच पोलिसांचा वचक राहतो. मात्र राज्यात शिक्षा लागण्याचे प्रमाण फक्त अडीच टक्के आहे. त्या तुलनेत बिहार, उत्तरप्रदेशसारख्या राज्यात शिक्षा लागण्याचे प्रमाण अनुक्रमे ३५ व ५० टक्के आहे. त्यामुळे पोलीस खाते किती निष्क्रिय आहे, याची प्रचिती येते. याचा विचार करून शरद पवार यांनी तातडीने राज्याचा गृहमंत्री बदलावा. अत्याचाराची घटना झाली की उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली जाते. खैरलांजी प्रकरणाचा निकाल काय लागला, यावरून निकम यांची कार्यपद्धतीही संशयास्पद वाटते. त्यामुळे निकम यांची नियुक्ती या प्रकरणात करू नये. सगळ््याच गोष्टींना काही निकम हे एकमेव उत्तर नाही.
...तर आमचाच गृहमंत्री
भाजपाचे सरकार दिल्लीत आल्यानंतर त्यांनी त्यांची चुणूक दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात मोदींचे सरकार काय दिवे लावणार, हे दिसते आहे. राज्यात पुन्हा आघाडीचीच सत्ता येणार आहे. त्यावेळी राज्याचे गृहमंत्रीपद काँग्रेस घेणार आहे. त्याशिवाय राज्यातील गुन्हे कमी होणार नाहीत, असे सांगून दलवाई यांनी पुन्हा एकदा आबांवर हल्लाबोल केला.