शंभरी ओलांडूनही सुस्थितीत दीनमित्र हस्तमुद्रण यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:06 IST2021-01-08T05:06:27+5:302021-01-08T05:06:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तिसगाव : सोमठाणे (ता. पाथर्डी) येथे २३ नोव्हेंबर १९१० ते २१ जानेवारी १९२० या नऊ वर्षे ...

शंभरी ओलांडूनही सुस्थितीत दीनमित्र हस्तमुद्रण यंत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
तिसगाव : सोमठाणे (ता. पाथर्डी) येथे २३ नोव्हेंबर १९१० ते २१ जानेवारी १९२० या नऊ वर्षे तीन महिन्यांच्या कालखंडात व त्यानंतर ४ डिसेंबर १९६७ पर्यंत ‘दीनमित्र’ वृत्तपत्राची छपाई करणाऱ्या हस्तमुद्रण यंत्राने शंभरी ओलांडली आहे. अद्यापही ते सुस्थितीत असून, सध्या ते नगरच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयात आहे.
४ डिसेंबर १९६७ ला दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांनी अखेरचा श्वास घेतल्यानंतर या हस्तमुद्रण यंत्राचा प्रवासही थांबला. हा अमूल्य ठेवा जतन व्हावा यासाठी मुकुंदरावांचे ज्येष्ठ पुत्र माधवराव यांनी १९७५ साली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपुर्द केला. सध्या हे हस्तमुद्रण यंत्र ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयात विराजमान आहे. एकशे दहा वर्षे होऊनही ते सुस्थितीत आहे.
विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात सोमठाणे येथे सत्यशोधक चळवळीचे कार्य जोमाने सुरू होते. मल्हारराव बापूजी शिदोरे आणि कान्हुजी बापूजी शिदोरे व सोमठाणेकर ग्रामस्थांनी बिनीचे सत्यशोधक कृष्णराव भालेकर यांची सत्यशोधक चळवळीवर व्याख्याने सोमठाणे व पंचक्रोशीत घडवून आणली. अनेकदा बैठकांमध्ये सत्यशोधक चळवळीला पूरक असे वृतपत्र काढण्यासाठी चर्चा होई. यादवराव, हरिभाऊ आणि धुराजी या तीन शिदोरे बंधूंनी मदतीचा हात देण्याचे आश्वासित केले. शिदोरे बंधूंच्या उत्साहाने भालेकर यांनी होकार दिला. त्वरित मुंबई गाठली व लंडन येथील नामांकित अशा गॅलसगो कंपनीचे हस्तमुद्रण यंत्र १९१० सालच्या आरंभास खरेदी केले. मुंबई येथील गॅलसगो कंपनीच्या एजंट व्यापाऱ्यांनी मागणीप्रमाणे लंडन येथून ते यंत्र मागवून भालेकर यांच्या स्वाधीन केले. मुंबईहून रेल्वेने अहमदनगर स्थानकावर भालेकर यांनी तर तेथून बैलगाडीने यंत्राचा प्रवास सोमठाणे गावी झाला. हस्तमुद्रण यंत्र आल्याचा आनंद असतानाच १० मे १९१० रोजी तरवडी येथे भालेकर यांचे निधन झाले. पुढे सहा महिन्यांनी मुकुंदराव पाटलांनी सोमठाणे येथून २३ नोव्हेंबर १९१० ला ‘दीनमित्र’चा पहिला अंक या हस्तमुद्रण यंत्राच्या छपाईने काढला.
---
सोमठाणेत ५२५ अंकांची छपाई..
२१ जानेवारी १९२० पर्यंत ५२५ अंकांची छपाई सोमठाणे गावी झाली. सोमठाणे येथून तरवडी येथे प्रेस हलविल्यानंतर १९६७ अखेर हजारो अंकांची छपाई या हस्तमुद्रण यंत्राने केली. सोमठाणे येथील ‘दीनमित्र’च्या शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने या हस्तमुद्रण यंत्राच्या आठवणी सोमठाणेकर आणि तरवडीकर यांच्यासह स्नेहांकित परिवारांच्या डोळ्यासमोर तरळतात.
फोटो : ०४ दिनमित्र