बदल्यांमधील त्रुटी दूर करण्याचा निर्णय
By Admin | Updated: June 10, 2016 23:38 IST2016-06-10T23:32:35+5:302016-06-10T23:38:41+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांसह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये त्रुटी आढळून आल्यास अशा सर्व बदल्या विभागीय महसूल आयुक्त यांच्या मार्फत दुरूस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बदल्यांमधील त्रुटी दूर करण्याचा निर्णय
अहमदनगर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांसह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये त्रुटी आढळून आल्यास अशा सर्व बदल्या विभागीय महसूल आयुक्त यांच्या मार्फत दुरूस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी जि.प. पदाधिकारी, विभागीय महसूल उपायुक्त (आस्थापना) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात बैठक झाली. यावेळी पदाधिकारी-सदस्य आणि प्रशासन यांच्यात झालेले समज गैरसमजावर पडदा टाकण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत काही सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यपध्दती विषयी उपायुक्तांकडे तक्रार केली.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेनंतर शिक्षकांच्या बदल्यांवरून प्रशासन विरोधात पदाधिकारी-सदस्य असा संघर्ष पहावयास मिळाला. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्यावर दबाब तंत्राचा वापर करूनही ते बदल्यांमध्ये बदल करत नसल्याने काही सदस्य संतप्त होते. अखेर या वादात विभागीय उपायुक्त सुखदेव बनकर यांची मध्यस्ती महत्वाची ठरली आहे. सर्वसाधारण सभेच्या दुसऱ्या दिवशी बनकर श्रीगोंदा दौऱ्यावर होते. त्या ठिकाणी बदल्यांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाची माहिती त्यांच्या कानावर गेली. त्यानंतर या वादातून मार्ग काढण्यासाठी त्यांना गळ घालण्यात आली.
यापूर्वी दोनदा उपायुक्त बनकर यांच्या उपस्थित बैठक बोलावण्यात आली होती. प्रत्यक्षात बनकर यांच्या गैरहजेरीमुळे ही बैठक झाली नव्हती. शुक्रवारी बनकर यांच्या उपस्थितीत नगरला बैठक झाली. यावेळी अध्यक्षा मंजुषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे, सभापती बाबासाहेब दिघे, शरद नवले, राजेंद्र फाळके, बाळासाहेब हराळ, सुजित झावरे उपस्थित होते. सुरूवातीला सदस्यांनी बदल्यांमधील त्रुटी मांडल्या. कधी कर्मचाऱ्यांची पदोन्नती करून बदल्या केल्या असत्या तर कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला नसता, असा सूर आळवण्यात आला. उपायुक्त बनकर यांनी सर्व ऐकून घेतल्यावर ज्या ज्या कर्मचाऱ्यांवर बदल्यात अन्याय झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. याला मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे आणि उपाध्यक्ष शेलार यांनी दुजोराही दिला. पदाधिकारी आणि प्रशासन वादावर पडदा पडल्याचे सांगण्यात आले. पुढे अवघे सहा महिने असून प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी हातात-हात घालून काम करणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
(प्रतिनिधी)
शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली तयार करण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर रिक्त असणाऱ्या जागा पाहून आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे यांनी स्पष्ट केले. तर उपाध्यक्ष शेलार यांनी पदोन्नतीनंतर रिक्त होणाऱ्या जागा आणि बिंदूनामावली दोन्ही एकत्र करून रिक्त होणाऱ्या सर्व जागांवर आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांना सामावून घेणार असल्याचे सांगितले.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेनंतर समानिकरणात काही शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची गैरसोय झालेली आहे. हा प्रश्न कसा सोडवता येईल, यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मार्गदर्शन मागवलेले आहे. त्यासंदर्भात अद्याप काहीही पत्र आलेले नसल्याचे बिनवडे यांनी सांगितले. लवकरच तहकूब सर्वसाधारण सभेची तारीख घेऊन ही सभा घेण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.