कर्जमाफी झाली आता पुन्हा पीक कर्ज द्या; कृषिमंत्र्यांच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 15:45 IST2020-05-29T15:29:37+5:302020-05-29T15:45:57+5:30
शेतक-यांना कर्ज मिळण्यासंदर्भातील हमी राज्य शासनाने स्वीकारली आहे. मात्र, येथील राष्ट्रीयीकृत बँकांची खरीप पीक कर्ज वाटपाची टक्केवारी अत्यल्प आहे. येत्या १५ जूनपर्यंत अधिकाधिक कर्जवाटप करा आणि या कामाला गती द्या, अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत.

कर्जमाफी झाली आता पुन्हा पीक कर्ज द्या; कृषिमंत्र्यांच्या सूचना
अहमदनगर : शेतक-यांना कर्ज मिळण्यासंदर्भातील हमी राज्य शासनाने स्वीकारली आहे. मात्र, येथील राष्ट्रीयीकृत बँकांची खरीप पीक कर्ज वाटपाची टक्केवारी अत्यल्प आहे. येत्या १५ जूनपर्यंत अधिकाधिक कर्जवाटप करा आणि या कामाला गती द्या, अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत.
भुसे यांनी गुरूवारी(दि.२८ मे) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या खरीप हंगाम तयारी संदर्भात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. नगर जिल्ह्यातील २ लाख ३९ हजाराहून अधिक शेतक-यांना १४६५ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली. याशिवाय, उर्वरित ४७ हजार शेतक-यांची ३८० कोटी रुपयांची कर्जमुक्तीही कोरोना संकटानंतर लगेच होणार आहे.
यंदा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतक-यांना कोणत्याही परिस्थितीत बी- बियाणे, खते, कीटकनाशकांची टंचाई जाणवणार नाही. तसेच खते आणि बियाणांचा काळाबाजार करण्याचे प्रकार घडले तर अशा दुकानदार आणि कंपन्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही भुसे यांनी दिला.
सध्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अटीमुळे काही शेतकरी त्यापासून वंचित राहतात. त्या त्या ठिकाणी होणाºया पावसाची नोंदही तपासली जाते. मात्र, त्यात अधिक परिपूर्णता कशी येईल, यासाठी कृषी विभाग अभ्यास करीत आहे. प्रायोगिक तत्वावर एखाद्या जिल्ह्यात तशी सुरुवात करण्याचा विचार असल्याचे भुसे यांनी सांगितले.
शेतक-यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने स्व. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजना राबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.