दोन बिबट्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2016 00:33 IST2016-04-02T00:25:12+5:302016-04-02T00:33:53+5:30
अकोले : तालुक्यातील वीरगाव शिवारात मृतावस्थेत आढळलेला बिबट्या हा दोन बिबट्यांच्या झुंजीत मरण पावला असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे.

दोन बिबट्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू
अकोले : तालुक्यातील वीरगाव शिवारात मृतावस्थेत आढळलेला बिबट्या हा दोन बिबट्यांच्या झुंजीत मरण पावला असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान, स्थानिक साक्षीदारांच्या समोर घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतरच बिबट्या हलविण्यात आला, असे वनविभागाचे म्हणणे आहे.
वीरगार येथे गुरुवारी एक बिबट्या मृतावस्थेत आढळला. ग्रामस्थांनी वनविभागाला सकाळी ही बाब कळविल्यानंतर विभागाचे पथक घटनास्थळी थेट दुपारनंतर दाखल झाले. सायंकाळी पत्रकारांना छायाचित्रे घेऊ न देता घाईघाईने बिबट्याचे शव हलविण्यात आले. वनविभागाच्या या भूमिकेमुळे संशयकल्लोळ निर्माण झाला.
बिबट्या जेथे आढळून आला तेथे रणकंदन झाल्याच्या खूना असून बिबट्याच्या अंगावर ओरबडल्याच्या खूना होत्या. परिसरात दोन बिबटे असल्याचे झुंजीवरुन आणि परिसरातील लोकांच्या सांगण्यावरुन स्पष्ट झाल्याने क्रोधीत झालेल्या बिबट्याने पुन्हा हल्ला करु नये म्हणून मृत बिबट्यास तातडीने सुगाव रोपवाटीकेत आणले. त्या परिसरातील दोन साक्षीदार घेवून स्पॉट पंचनामा केल्यानंतर बिबट्याला सुगाव रोपवाटीकेत आणले गेले. श्वविच्छेदन करुन येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले,
मोबाईलवर फोटो व्हायरल होऊन गर्दी वाढेल या भितीपोटी पत्रकारांना छायाचित्रे घेऊ दिली नाहीत असे वन अधिकाऱ्याने सांगितले.
वीरगाव येथे आढळून आलेल्या मृत बिबट्याचे शवविच्छेदन मी केले. दोन बिबट्यांच्या भांडणात त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. माझे समोरच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
-डॉ.आर.डी.भांगरे,
प्रभारी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तथा पशुधन विकास अधिकारी अकोले