अटकेच्या भीतीने पेटवून घेतलेल्या तरुणाचा मृत्यू; श्रीरामपुरातील घटना
By शिवाजी पवार | Updated: March 12, 2023 17:23 IST2023-03-12T17:22:32+5:302023-03-12T17:23:01+5:30
लग्नाळू मुलांना नवरी देण्याच्या आमिष देऊन फसवणाऱ्या टोळीतील तो संशयित आरोपी आहे.

अटकेच्या भीतीने पेटवून घेतलेल्या तरुणाचा मृत्यू; श्रीरामपुरातील घटना
श्रीरामपूर : जालना जिल्ह्यातील पोलिस तपासासाठी आल्याचे समजताच अटकेच्या भीतीने अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेणाऱ्या तरुणाचा उचारादरम्यान शनिवारी रात्री मृत्यू झाला. तरुणावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू होते.
मयत तरुणाचे नाव जाकीर बबन पठारे (रा. दत्तनगर, पुणतांबा रोड, श्रीरामपूर) असे आहे. लग्नाळू मुलांना नवरी देण्याच्या आमिष देऊन फसवणाऱ्या टोळीतील तो संशयित आरोपी आहे. जालना जिल्ह्यातील गौंडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे. त्याच्या तपासाकरिता शनिवारी तेथील पोलिस दत्तनगरला आले होते. ही माहिती मिळताच पठारे हा दुकानामध्ये गेला.
श्रीरामपूर शहरालगत असलेल्या दत्तनगर ग्रामपंचायत हद्दीत एका वेल्डिंग वर्क्समध्ये पठारे याने पेटवून घेतले. पोलिस आपल्याला अटक करतील, अशी त्याला भीती होती. घटनेनंतर मोठा गोंधळ उडाला. नातेवाईकांनी त्याला विझविण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यासह शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्याला लोणीला हलविण्यात आले.
दरम्यान, हा तरुण रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला. पोलिसांवरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. तपास पद्धतीवर त्यांचे आक्षेप आहेत. रविवारी सायंकाळी दत्तनगर येथील अमरधाममध्ये पठारे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात होता.