कृष्णदेव महाराज काळे यांचे देहावसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 11:59 IST2021-09-18T11:59:14+5:302021-09-18T11:59:47+5:30
दहिगावने ( जि. अहमदनगर) : शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील दघ्नेश्वर शिवालयाचे प्रमुख ह.भ.प. कृष्णदेव महाराज काळे यांचे आज, शनिवारी पहाटे देहावसान झाले.

कृष्णदेव महाराज काळे यांचे देहावसान
दहिगावने ( जि. अहमदनगर) : शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील दघ्नेश्वर शिवालयाचे प्रमुख ह.भ.प. कृष्णदेव महाराज काळे यांचे आज, शनिवारी पहाटे देहावसान झाले.
महाराजांच्या निधनाची वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. महाराजांच्या अंतिम दर्शनासाठी भाविक येत आहेत. दध्नेश्वर शिवालय ते दहिगावने गावात अंतिम यात्रा मिरवणूक होणार असून देवगडचे भास्करगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत दध्नेश्वर शिवालयात अंतिमसंस्कार केले जाणार आहेत. वयोवृद्ध, तपोवृद्ध असलेले काळे महाराज आपल्या शांत व संयमी स्वभावासाठी सुपरिचित होते. वारकरी संप्रदायाचे आयुष्यभर पालन करणारे काळे महाराज 'देवा' या नावाने ओळखले जायचे. ज्ञानेश्वरी त्यांच्या तोंडपाठ होती. आयुर्वेदाचे गाढे अभ्यासक असणारे काळे महाराज जोग महाराज वारकरी शिक्षण परंपरेतील एक आदर्श व्यक्तिमत्व होते. सर्व साधकांवर ते नितांत प्रेम करत. देवगडचे गुरुवर्य किसनगिरी बाबा आणि रांजणी येथील गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले यांच्या शिष्यांपैकी एक असलेले महंत कृष्णदेव महाराज शेवगाव तालुक्यातील परमार्थाला मार्गदर्शन करणारे व दिशा देणारे गुरु होते. आज त्यांचे हजारो साधक त्यांच्या जाण्याने पोरके झाल्याची भावना व्यक्त करत आहेत. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक अशा सर्वच क्षेत्रातील मातब्बर मंडळी हजेरी लावत आहेत.