खर्डा : जामखेड तालुक्यातील मोहरी येथे भरदिवसा घरफोडी होऊन एक लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. येथील ही महिनाभरातील दुसरी घटना आहे.
मोहरी गावाच्या रस्त्यालगतच राहणाऱ्या चंद्रभान माणिक वाघमारे यांच्या घराचे कुलूप भरदिवसा दुपारीच फोडून चोरट्यांनी रोख ६० हजार व इतर घरातील ऐवज असा एक लाख ५६ हजारांचा ऐवज लंपास केला. सुगीचे दिवस असल्यामुळे शेतकरी सध्या शेती कामात व्यस्त असतानाच चोरट्यांनी हा डाव साधला. याबाबतची फिर्याद त्यांनी जामखेड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा दाखल केली. काही दिवस अगोदर मोहरी गावात दिवसा घरफोडी झाली होती. जामखेड तालुक्यातील लोणी येथील बबन विश्वनाथ परकड व अरुण परमेश्वर परकड यांच्या बंद घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी चोरी केली. बबन विश्वनाथ परकड यांच्या घरातील रोख ५२ हजारांचा ऐवज चोरीस गेला. अरुण परमेश्वर परकड यांच्या घरात उचकापाचक करून चोरीचा प्रयत्न झाला. याबाबत रात्री उशिरापर्यंत कुठलीही तक्रार दाखल नव्हती.