Shirdi Sai Baba VIP Darshan: साई मंदिरात महत्त्वाच्या व्यक्तींना दर्शन घेण्यासाठी दिवसभरात केव्हाही दर्शन रांग थांबवावी लागत होती. यामुळे दर्शन रांगेतील सामान्य भक्तांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याशिवाय सुरक्षा आणि इतर प्रशासकीय यंत्रणोवरही अतिरिक्त ताण येत होता. या पार्श्वभूमीवर संस्थानच्या तदर्थ समितीने व्हीआयपी दर्शनासाठी आता वेळा निश्चित केल्या आहेत. या 'ब्रेक दर्शन' व्यवस्थेमुळे दर्शन रांगेत ताटकळत रहावे लागणार नाही. साईसंस्थानच्या समितीने रविवारी हा निर्णय घेतला.
व्हीआयपी आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या दर्शनासाठी 'ब्रेक दर्शन' व्यवस्था रविवारी दुपारपासून सुरू केली आहे, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. जे भाविक झटपट दर्शनासाठी विनाशिफारस सशुल्क दर्शन पास काढतील, त्यांना पूर्वीप्रमाणे दर्शन कॉम्प्लेक्समधून स्वतंत्र रांगेतून मंदिरापर्यंत जाता येईल. मात्र, मंदिरात सामान्य भाविकाच्या रांगेतूनच त्यांना दर्शन मिळेल. आरतीसाठीची सशुल्क व्यवस्था पूर्वीप्रमाणे असेल.
'ब्रेक दर्शन'मधून यांना सूट
खालील अतिमहत्त्वाच्या व्यक्त्ती आणि मोठ्या देणगीदारांना वेळेचे बंधन नसेल. त्यांची दर्शनाची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच असेल.
राजकीय आणि न्यायिक पदाधिकारी: भारताचे आजी माजी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, सर्व राज्यांचे राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व इतर न्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष/उपाध्यक्ष, केंद्रीय मंत्री, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मंत्री, विधानसभा/ विधान परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष, आमदार, खासदार आणि विविध उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश व इतर न्यायाधीश.
प्रसिद्ध उद्योगपती, आंतरराष्ट्रीय खेळाडू, सिनेअभिनेते, शास्त्रज्ञ आणि संस्थानच्या व्यवस्थापन/तदर्थ समितीचे आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य. एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक देणगी देणारे साईभक्त.
दिलेल्या वेळेतच साईदर्शन
नव्या नियमांनुसार, शिफारस घेऊन येणाऱ्या मान्यवरांना आता केवळ निश्चित वेळेतच साईदर्शन घेता येणार आहे. यासाठी दिवसातून तीन वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत.
दिलेल्या वेळेत समाधी मंदिरातील एका बाजूने ब्रेक दर्शनाची सोय केली जाईल. जेणेकरून सामान्य भक्तांची दर्शनरांग अव्याहतपणे सुरू राहील.
अशा आहेत वेळा
सकाळी ९:०० ते १०:०० (एक तास) दुपारी २:३० ते ३:३० (एक तास) रात्री ८:०० ते ८:३० (अर्धा तास)