लसीकरण केंद्रांवर उफळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:21 IST2021-05-12T04:21:58+5:302021-05-12T04:21:58+5:30
अहमदनगर : महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळणार असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी भल्या सकाळीच रांगा लावल्या होत्या. मात्र पुरेशी ...

लसीकरण केंद्रांवर उफळली गर्दी
अहमदनगर : महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळणार असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी भल्या सकाळीच रांगा लावल्या होत्या. मात्र पुरेशी लस उपलब्ध नसल्याने लस मिळाला नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला. दरम्यान, पोलिसांना पाचारण करण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
महापालिकेच्या वतीने कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. कोव्हॅक्सिन लस गेल्या काही दिवसांपासून उपलब्ध होत नव्हती. महापालिकेने पाठपुरावा केल्यानंतर ही लस उपलब्ध झाली. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. कोव्हॅक्सिन लस मिळणार असल्याने नागिरकांनी महापालिकेच्या सर्वच आरोग्य केंद्रांवर गर्दी केली होती. परंतु, डोस ५० आणि नावनोंदणी ३०० ते ४०० ,अशी अवस्था होती. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. सावेडी आरोग्य केंद्रात ६० डोस मिळाले होते. परंतु, तेथील निम्मे म्हणजे ३० डोस कॉटेज कॉर्नर येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रात पाठविण्यात आली. त्यामुळे ३० जणांना डोस देऊन इतरांना डोस संपले असल्याचे सांगण्यात आले. संतप्त नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारला असता वरिष्ठांचा आदेश असल्याने निम्मे डोस इतरत्र पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. तासन्तास रांगेत उभे राहून डोस न मिळाल्याने नागिरकांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला. दरम्यान, महापालिकेच्या माळीवाडा येथील केंद्रात लस घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. परंतु, तेथील लस संपली. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. अखेर ६० वर्षांपुढील नागरिकांनाच फक्त लस दिली जाईल, असे प्रशसानाकडून ध्वनिक्षेपकाव्दारे जाहीर केले गेले. तसेच पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने गर्दी नियंत्रणात आली. पुरेसे डोस उपलब्ध न झाल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
.......
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी राज्य सरकारकडून लस उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र गेल्या शनिवारपासून ही लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील नागिरकांचे लसीकरण प्रशासनाकडून बंद करण्यात आले असून, ४५ वर्षांपुढील नागरिकांनाच फक्त लस दिली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.