सिद्धटेकला अंगारकी चतुर्थीनिमित्त गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:22 IST2021-07-28T04:22:39+5:302021-07-28T04:22:39+5:30
सिद्धटेक : अष्टविनायक गणपतीपैकी एक असलेल्या सिध्दटेक येथील सिध्दिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी (दि. २७) गर्दी झाली. त्यामुळे ...

सिद्धटेकला अंगारकी चतुर्थीनिमित्त गर्दी
सिद्धटेक : अष्टविनायक गणपतीपैकी एक असलेल्या सिध्दटेक येथील सिध्दिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी (दि. २७) गर्दी झाली. त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्णांमुळे लावण्यात आलेल्या जनता कर्फ्यूचा फज्जा उडाला. ना मास्क, ना सॅनिटायझरचा वापर अशा अवस्थेत भाविकांचा मुक्त संचार मंदिर परिसरात पाहावयास मिळाला. मंदिर बंद असल्याने बाहेरून भाविकांनी दर्शन घेतले.
सिद्धटेक-बेर्डी ग्रामपंचायतने तहसीलदार यांच्या आदेशाने वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी सात दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला होता. परंतु दीड वर्षानंतर अंगारकी चतुर्थी आल्याने मंगळवारी मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे पोलीस प्रशासनास बंदोबस्त वाढवावा लागला.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षात व्यवसाय न झाल्याने हतबल असलेल्या व्यावसायिकांना अंगारकी चतुर्थीला मोठा व्यवसाय होण्याची अपेक्षा होती. परंतु मंदिर बंद होते. त्यातच जनता कर्फ्यूमुळे दुकाने उघडावीत तर दंड होण्याची भीती व्यापाऱ्यांना होती. यामुळे काही दुकानदारांनी तहसीलदारांची भेट घेऊन आपली व्यथा सांगितली. मात्र, वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी नियम पाळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे अंगारकी चतुर्थीच्या दिवशीच सिद्धटेक येथे १४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन सतर्क झाले.
.............................
२७ सिद्धटेक