कोपरगाव तालुक्यातील पिकांना मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:25 IST2021-08-21T04:25:02+5:302021-08-21T04:25:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : यंदाच्या पावसाळ्यात कोपरगाव तालुक्यात सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यातच जुलैच्या शेवटी व ऑगस्टच्या ...

कोपरगाव तालुक्यातील पिकांना मिळाले जीवदान
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : यंदाच्या पावसाळ्यात कोपरगाव तालुक्यात सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यातच जुलैच्या शेवटी व ऑगस्टच्या सुरुवातीचा पंधरवडा असा एक महिना पावसाने पूर्णतः विश्रांती घेतली होती. त्यामुळे पेरणी केलेली पिके सुकू लागली होती. मात्र, १६ ऑगस्टपासून सर्वत्र पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याने खरिपातील सर्वच पिकांना जीवदान मिळाल्याने पिके जोमात उभी आहेत. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.
कोपरगाव कृषी विभागाकडे चालू आठवड्याच्या व खरीप हंगामाचा अंतिम पीक पेरणी अहवालानुसार तालुक्यातील ७९ गावात यंदा सरासरीच्या १९२.९ टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहे. त्यात संपूर्ण तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र हेक्टरमध्ये ७० हजार ६१३ आहे. त्यामध्ये लागवडीस योग्य असलेले ६० हजार ७९४ इतके असून बागायती ३८ हजार ३७७ तर जिरायती २२ हजार ४१७ इतके आहे. खरीप हंगामासाठी सरासरी ३३ हजार ६१७ इतके हेक्टर क्षेत्र आहे. त्यामध्ये सर्व क्षेत्र हेक्टरमध्ये बाजरी १४३८,कपाशी २०७५, सोयाबीन २४ हजार ३९१, मका १६ हजार ३०५, उडीद ५०, तूर ८१, मूग ३७८.५०, भुईमूग ४२३, फळबागा २४१९, चारापिके २८३१, भाजीपाला ६४०.१, मसाला पिके ८३.६० व ऊस ६०६५.८० हेक्टर नोंद आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला ब्रिटिशांनी शाश्वत सिंचनाची सोय करत शेतीला प्रथम प्राधान्य होते. परंतु, अलीकडच्या काळात कालवा सिंचनाचे शेतीसाठीचे नियोजन हे पूर्णतः कोलमडले आहे. गेल्या महिनाभरात लाभक्षेत्रातील पिके जळू लागल्याने गोदावरीच्या दोनही कालव्यांना पाणी सोडण्याच्या मागणीने जोर धरला होता. जेणेकरून कालव्याच्या भरवशावर असलेल्या शेतातील पिके जगतील, अशी आशा होती. मात्र, कालव्यांना पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागही सकारत्मक नव्हता. तर सत्ताधारी राजकीय गोटातूनही कोणत्याच हालचाली झाल्या नाही. कालव्याना पाणी आलेच नाही. परंतु, पुन्हा एकदा वरुण राजाच शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला. गेली पाच दिवस सुरू राहिलेल्या संततधार पावसामुळे सर्वच पिकांची आबादानी झाली. त्यामुळे लाखोंचा खर्च करून धोक्यात आलेला खरीप हंगाम बचावला आहे.
.............
या आठवड्यात संततधार पाऊस पडल्यामुळे खरिपाची पिके वाचली आहे. मात्र, या पावसामुळे पिकांबरोबर तण वाढणार आहे. त्यामुळे ते वाढू न देणे तसेच आता कपाशी पिकावर बॊंडअळी व मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी पिकामध्ये फिरून पाहणी करावी. तसेच काही आढळल्यास तत्काळ कीटकनाशकांची फवारणी करावी.
- अशोक आढाव, तालुका कृषी अधिकारी, कोपरगाव
.............
फोटो ओळी -
कोपरगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन पीक जोमात उभी आहे.(छायाचित्र : गणेश देवकर)