पीक विमा योजनेचे निकष बदलले

By Admin | Updated: June 6, 2014 01:00 IST2014-06-05T23:51:10+5:302014-06-06T01:00:47+5:30

अहमदनगर/बाभळेश्वर : खरीप हंगामातील पिकांना लागू केलेली सर्वंकष पीक विमा योजनेत राज्य सरकारने यावर्षीपासून बदल केले आहेत़

The Crop Insurance Scheme's criteria changed | पीक विमा योजनेचे निकष बदलले

पीक विमा योजनेचे निकष बदलले

अहमदनगर/बाभळेश्वर : खरीप हंगामातील पिकांना लागू केलेली सर्वंकष पीक विमा योजनेत राज्य सरकारने यावर्षीपासून बदल केले आहेत़ आता खरीप हंगामातील पिकांनाही फळपिकांप्रमाणेच हवामान आधारित पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे़ पहिल्या टप्प्यात ही योजना १२ जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, योजनेत सात पिकांचा समावेश करण्यात आला आहे़
प्रत्येक महसूल विभागातील दोन जिल्ह्यांमध्ये खरीप पिकांना हवामान आधारित पथदर्शी पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे़ याबाबत माहिती देताना कृषी मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, राज्यातील ८३ टक्के क्षेत्र कोरडवाहू असून या क्षेत्राच्या कृषी उत्पादनावर हवामान घटकांचा मोठा परिणाम होत आहे़ राज्यात यापूर्वी सर्वंकष पीक विमा योजना लागू होती़
या योजनेद्वारे पीक उत्पादनावर आधारित शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिली जात होती़ मात्र, प्रतिकूल हवामानाने पीक उत्पादन घटल्यास त्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळत नव्हता़ हवामानात सातत्याने बदल होत असल्यामुळे शेतकर्‍यांना वारंवार नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत होते़ त्यामुळे खरीप हंगामातील पिकांनाही हवामानावर आधारित पीक विमा योजना लागू करण्याचे सरकारच्या विचाराधीन होते़ याबाबतचा शासननिर्णय नुकताच लागू करण्यात आला आहे़ पहिल्या टप्प्यात विमा योजनेची अंमलबजावणी १२ जिल्ह्यांमध्ये होणार असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले़
या पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतीम मुदत ३० जून असून या योजनेच्या माहितीसाठी शेतकर्‍यांनी स्थानिक कृषी अधिकार्‍यांशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विखे यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)

राज्यातील ठाणे, रायगड, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली, लातुर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा या बारा जिल्ह्यांचा यात समावेश करण्यात आला आहे़
भात, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन व कापूस या पिकांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे़
अपुरा आणि अती!
अपुरा पाऊस, पावसातील खंड व अती पाऊस या तीन घटकांच्या धोक्यापासून शेतपिकांना या योजनेअंतर्गत संरक्षण देण्यात आले आहे़
४स्वयंचलीत हवामान केंद्राव्दारे हवामानातील बदलाची नोंद करण्यात येणार आहे़

Web Title: The Crop Insurance Scheme's criteria changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.