सहा लाख शेतकर्यांची पीक विमा नोंदणी; विखे पाटलांनी शासन आपल्या दारी उपक्रमात दिली माहिती
By शिवाजी पवार | Updated: July 31, 2023 16:11 IST2023-07-31T16:11:19+5:302023-07-31T16:11:32+5:30
उत्सव मंगल कार्यालयात शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सहा लाख शेतकर्यांची पीक विमा नोंदणी; विखे पाटलांनी शासन आपल्या दारी उपक्रमात दिली माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राज्य सरकारने सुरू केलेल्या एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नगर जिल्ह्यातील ५ लाख ९१ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
येथील उत्सव मंगल कार्यालयात शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी किरण सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे, नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष दीपक पटारे, माजी जि.प.सदस्य शरद नवले, केतन खोरे, संदीप चव्हाण, दत्ता जाधव, शहराध्यक्ष मारुती बिंगले, रवी पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी विखे पाटील यांनी नगरपालिका, पंचायत समिती, प्रांताधिकारी कार्यालय, तहसील, महावितरण, भूमि अभिलेख, कृषी विभाग यांच्या वतीने राबविल्या जाणार्या योजनांचा लाभार्थींना लाभ दिला. नागरी समस्यांचे निवारण यावेळी त्यांनी केले. नागरिकांच्या प्रश्नांची निवेदने स्वीकारत अधिकार्यांना सूचना केल्या. प्रधानमंत्री आवास योजना, पथ विक्रेत्यांसाठी असलेल्या योजनेतील लाभार्थी व महिला बचतगटांना धनादेशाचे वितरण मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
विखे पाटील म्हणाले, श्रीरामपूर तालुक्यात पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १५ कोटी रुपयांची मदत राज्य सरकारने करून दिलासा दिला आहे. संकटकाळात सरकार शेतकर्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे.