पावसाअभावी पिके करपली
By Admin | Updated: August 17, 2014 23:11 IST2014-08-17T23:07:12+5:302014-08-17T23:11:05+5:30
अहमदनगर : जून पाठोपाठ जुलै कोरडा गेला. आता आॅगस्टमधील १५ दिवस लोटले आहेत. जेमतेम पावसावर खरीप हंगामासाठी अवघी ५० टक्के पेरणी झाली.

पावसाअभावी पिके करपली
अहमदनगर : जून पाठोपाठ जुलै कोरडा गेला. आता आॅगस्टमधील १५ दिवस लोटले आहेत. जेमतेम पावसावर खरीप हंगामासाठी अवघी ५० टक्के पेरणी झाली. आज पाऊस होईल, उद्या पाऊस होईल, या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांनी केलेली पेरणी आता वाया जाण्याची परिस्थिती आहे. उगवलेली पिके आता करपू लागली असून पावसासाठी सर्वांना त्राहीमाम करण्याची करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात यंदा पावसाअभावी भीषण परिस्थिती आहे. शेतीचे सोडाच पिण्यासाठीही पाणी नाही. जिल्ह्यात आजही ३०० पाण्याच्या टँकरव्दारे साडेपाच लाख जनतेला सरकारी पाण्याच्या टँकरव्दारे पाण्याचा पुरवठा होत आहे. दुसरीकडे शेतीची परिस्थिती वाईट झाली आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे बियाणे खरेदी केले. त्यापैकी निम्म्यांहून अधिक बियाणे शेतकऱ्यांकडे पाडून असून त्यापेक्षा वाईट अवस्था व्यापाऱ्यांची आहे. नगरच्या बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांचे बियाणे पडून आहे. जिल्ह्यात आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ५०. ६६ टक्के खरिपासाठी पेरणी झालेली आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे आहे. कपाशीच्या एकूण क्षेत्रापैकी १३५ टक्के लागवड झाली असून तेल बियांची ४३ टक्के, सोयाबीन पिकाची ५१ टक्के, बाजरीची ३१ टक्के, मका ५४ टक्के, तूर ३९.९८ टक्के, मूग ३१.५३ टक्के, उडीद ५८.६७ टक्के पेरणी झालेली आहे. भुईमूग पिकाची ४५ टक्के पेरणी झालेली आहे. यातील काही कडधान्यांच्या पिकांचा कालावधी संपला असून उर्वरित पिके पाण्याअभावी करपू लागली आहे. मुळा आणि भंडारदरा धरणाचे पाणलोटक्षेत्र वगळता अन्य ठिकाणी पाऊस नाही. यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पावसावरच रब्बीचे भवितव्य आहे. (प्रतिनिधी)