सहकार खात्याच्या निर्मितीने साखर सम्राट धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST2021-07-12T04:14:44+5:302021-07-12T04:14:44+5:30
अहमदनगर: नव्याने खाते निर्माण करत सहकारावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. अहमदनगरसह राज्यातील सहकार क्षेत्रावर काँग्रेस- राष्ट्रवादीचे ...

सहकार खात्याच्या निर्मितीने साखर सम्राट धास्तावले
अहमदनगर: नव्याने खाते निर्माण करत सहकारावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. अहमदनगरसह राज्यातील सहकार क्षेत्रावर काँग्रेस- राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. सहकार खात्याच्या माध्यमातून भाजपकडून होणारा हस्तक्षेप सर्वासाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सहकारात वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड सुरू असलेले जिल्ह्यातील साखर सम्राट चांगलेच धास्तावले आहेत.
सक्त वसुली संचालनालयाने साखर कारखान्यांना वाटप केल्या जाणाऱ्या कर्जपुरवठ्याची चौकशी सुरू केली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाची माहिती मागविण्यात आली आहे. ईडीच्या या चौकशीने सहकार क्षेत्र ढवळून निघाले असतानाच केंद्र सरकारने मंत्रिमंडळात फेरबदल करत नवीन सहकार खात्याची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या खात्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सहकार खाते निर्मितीवरून राज्यात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. हे खाते निर्माण करण्यामागील केंद्राचा हेतू अस्पष्ट आहे, अशी टीका राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब यांनी शनिवारी नगरमध्ये केली. नगर जिल्ह्यात सहकाराचे मोठे जाळे आहे. त्यावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वर्चस्व आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे. जिल्हा बँकेकडून जिल्ह्यातील साखर कारखान्यांना वारेमापपणे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बहुतांश कारखान्यांनी कर्जाची परतफेड केलेली नाही. साखर कारखान्यांना केलेल्या कर्ज वाटपावरून भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी बँकेवर मध्यंतरी गंभीर आरोप केले होते. जिल्हा सहकारी बँकेच्या नोकर भरतीत गैरव्यवहार झाल्याचेही चौकशीत निष्पन्न झालेले आहे. तसेच साखर कारखान्यांना नियमबाह्य कर्ज वाटप केल्याच्याही काही तक्रारी आहेत. कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना भाव दिलेला नाही. याबाबत काही कारखान्यांना नोटिसाही बजावण्यात आलेल्या आहेत. नव्याने सहकार खाते निर्माण झाल्याने सहकारी कारखाने केंद्राच्या अखत्यारित येण्याची शक्यता आहे. तसेच बँकांकडून कारखान्यांना केल्या जाणाऱ्या कर्ज वाटपावरही टाच येण्याची शक्यता आहे.
.....
सहकारावर अप्रत्यक्षरित्या नियंत्रण
राज्यातील सहकारावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे वर्चस्व आहे. भाजपनेही सहकार खाते निर्माण करून एकप्रकारे महाविकास आघाडीला आव्हान दिले आहे. सहकारावर अप्रत्यक्षरित्या नियंत्रण आणण्याचा भाजपाचा हा प्रयत्न असून, त्यावर आघाडीचे नेते कशी मात करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.