धारणगाव रोडलगत जॉगिंग ट्रॅकची निर्मिती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:21 IST2021-03-17T04:21:02+5:302021-03-17T04:21:02+5:30
कोपरगाव : शहरातील धारणगाव रोडलगत असलेल्या नगरपरिषदेच्या जागेत छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते बैलबाजार रोड या सुमारे ४५० फूट ...

धारणगाव रोडलगत जॉगिंग ट्रॅकची निर्मिती करा
कोपरगाव : शहरातील धारणगाव रोडलगत असलेल्या नगरपरिषदेच्या जागेत छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते बैलबाजार रोड या सुमारे ४५० फूट लांब जागेत ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने जॉगिंग ट्रॅक तयार करावा, अशी मागणी कोपरगावातील प्रतिष्ठित व्यापारी मंदार आढाव यांनी केली आहे.
आढाव म्हणाले, श्रीरामपूर नगरपरिषदेने ज्येष्ठ नागरिकांसह सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी सर्व सुविधायुक्त व धूळमुक्त असे जॉगिंग ट्रक तयार केले आहेत. त्यामुळे तेथील नागरिक सकाळी व सायंकाळी आपल्या सोयीप्रमाणे स्वतःचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी जॉगिंग ट्रॅकचा उपयोग करतात. सध्या कोरोनाच्या महामारीतदेखील त्यांना हे जॉगिंग ट्रॅक खूप उपयुक्त ठरत आहेत.
याउलट कोपरगाव शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी पाहिजे त्या प्रमाणात व पाहिजे तसे जॉगिंग ट्रॅक उपलब्ध नाहीत. जी उद्याने तयार केली आहेत, तेथेही पाहिजे त्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यातच ज्येष्ठांनी शहरातील रस्त्यांवर फिरावे म्हटले तर सततची रहदारी आणि खड्डे, धूळ यांच्यामुळे घराबाहेर पडणेदेखील कठीण होते आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट आहे. त्याचा सर्वाधिक धोका हा ज्येष्ठ नागरिकांना आहे. मात्र, त्यावर पर्याय म्हणून व्यायाम, तसेच पायी फिरणे यातून शारीरिक फायदा होतो. परंतु, कोपरगावात अशी सुविधा नसल्याने येथील ज्येष्ठासाठी गैरसोईचे ठरत आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता, नगरपरिषदेने लवकरात लवकर सुविधायुक्त जॉगिंग ट्रॅक तयार करावा, असेही आढाव यांनी शेवटी म्हटले आहे.