शेतातील पीक चोरीबाबत न्यायालयाकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST2021-07-21T04:15:25+5:302021-07-21T04:15:25+5:30
याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील तिगाव येथील भास्कर कारभारी गायकवाड यांनी ॲड. सुरेंद्र जानराव यांच्यामार्फत संगमनेर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली ...

शेतातील पीक चोरीबाबत न्यायालयाकडून दखल
याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील तिगाव येथील भास्कर कारभारी गायकवाड यांनी ॲड. सुरेंद्र जानराव यांच्यामार्फत संगमनेर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. जिल्हा न्यायाधीश (क्र.२) एस. वाय. भोसले यांच्यासमोर या याचिकेची सुनावणी झाली. याचिकाकर्ते यांची तिगाव येथे वडिलोपार्जित शेतजमीन व जनावरे आहेत. ते नोकरीनिमित्त पुणे येथे राहतात. नोकरी संभाळून ते गावाकडील शेती करतात. शेजारी राहणाऱ्या लोकांनी गायकवाड यांच्या शेतीवर कब्जा केल्याच्या प्रकरणात संगमनेर न्यायालयात दिवाणी दावा सुरू आहे. सदर जमिनीतील गायकवाड यांचा हिस्सा वगळून इतर मिळकतीबाबत हा दावा सुरू आहे. गायकवाड यांनी त्यांच्या हिश्याच्या जमिनीत जनावरांसाठी मका पेरला होता. ज्यांच्या विरोधात दावा सुरू आहे त्या लोकांनी गायकवाड यांच्या शेतातील मका कापून नेला. याबाबत गायकवाड हे संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले; मात्र त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यानंतर गायकवाड यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही निवेदन देऊन दाद मागितली; मात्र कुणीच त्यांची दखल घेतली नाही. त्यानंतर गायकवाड यांनी ॲड. जानराव यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. याचिकेतील प्रतिवादींना न्यायालयाने नोटीस काढली असून, याबाबत २ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी असल्याचे ॲड. जानराव यांनी सांगितले.
----------------------------
कुठल्याही तक्रारदाराची फिर्याद दाखल करून घ्यावी, असे सुप्रिम कोर्टाचे आदेश आहेत. याचिकाकर्ते भास्कर गायकवाड यांच्या शेतातील पीक चोरीबाबत पोलिसांनी फिर्याद दाखल करून न घेतल्याने त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस पाठवून म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रतिवादींमध्ये संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी, राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक, राज्याचे मुख्य सचिव, नगरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांचाही समावेश आहे.
- ॲड. सुरेंद्र जानराव, याचिकाकर्त्यांचे वकील.