अभिनेत्री प्रियंका चोप्राला न्यायालयाची नोटीस
By Admin | Updated: June 22, 2014 00:44 IST2014-06-22T00:44:26+5:302014-06-22T00:44:44+5:30
अहमदनगर : गणवेशावर पोलीस खात्याचा ‘मोनोग्राम’ लावून चित्रपटात अश्लील नृत्य करून पोलीस खात्याची बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री प्रियंका चोप्रा, अभिनेता रामचरण तेजा
अभिनेत्री प्रियंका चोप्राला न्यायालयाची नोटीस
अहमदनगर : गणवेशावर पोलीस खात्याचा ‘मोनोग्राम’ लावून चित्रपटात अश्लील नृत्य करून पोलीस खात्याची बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री प्रियंका चोप्रा, अभिनेता रामचरण तेजा यांच्यासह जंजीर चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक यांना आपले म्हणणे सादर करण्याची नोटीस जिल्हा न्यायालयाने बजावली आहे. या प्रकरणी म्हणणे सादर करण्यासाठी ५ आॅगस्टला न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
जंजीर चित्रपटातील ‘मुंबई के हिरो’ या गाण्यातील कपड्यांमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याच्या फिर्यादीवर सुनावणी दरम्यान जिल्हा न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांनी हे आदेश दिले आहेत. जंजीर चित्रपटात ‘मुंबई के हिरो’ या गाण्यात पोलिसांचे कपडे आणि मोनोग्राम वापरून लज्जा वाटेल असे नृत्य अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने केले होते. याप्रकरणी चोप्रा यांच्यासह चित्रपट निर्माता पुनीत मेहरासह पाच जणांविरुद्ध पोलीस नाईक संजीव पाटोळे यांनी सप्टेंबर २०१३ मध्ये खासगी फिर्याद दाखल केली होती. या गाण्यात प्रियंका आणि रामचरण यांनी वापरलेल्या खाकी गणवेशावर महाराष्ट्र पोलीस दलाचा लोगो (मोनोग्राम), तिरंगी
झेंडा आणि भारतीय राजमुद्रा लावण्यावर पाटोळे यांनी आक्षेप घेतला होता. आपण मुलासह इंटरनेटवर या चित्रपटातील गाणे पाहत असताना पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचे लक्षात आल्याचे पाटोळे यांनी फिर्यादित म्हटले होते. पाटोळे यांच्यावतीने अॅड. शिवाजी सांगळे यांनी नगरच्या जिल्हा न्यायालयात ही खासगी फिर्याद दाखल केली होती. काही महिन्यांपूर्वी कनिष्ठ न्यायालयात यावर सुनावणी झाली. न्यायालयाने ही फिर्याद फेटाळली होती. इंटरनेटवर पाहिलेले गाणे हे सार्वजनिक ठिकाण ठरत नसल्याचे कनिष्ठ न्यायालयाने म्हटले होते. या निर्णयाच्या विरोधात अपिल करण्यात आले होते. त्यावर झालेल्या प्राथमिक सुनावणीत न्यायालयाने प्रियंका व संबंधितांना स्वत: अगर वकिलांमार्फत पाच आॅगस्टला न्यायालयात हजर राहून बाजू मांडण्याचा आदेश दिला आहे.