नगरसेवक पुत्राकडून महापालिका कामगारांना मारहाण; कामगारांचा पालिकेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 17:00 IST2017-11-28T12:48:51+5:302017-11-28T17:00:32+5:30
शहरातील झेंडीगेट परिसरात ड्रेनेजचे काम करत असताना महापालिकेच्या दोघा कामगारांना अपक्ष नगरसेवकाच्या पुत्राने मारहाण केली. या नगरसेवक पुत्रावर कारवाई करावी, अन्यथा महापालिकेचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा देत मंगळवारी कामगारांनी महापालिकेवर मोर्चा काढला.

नगरसेवक पुत्राकडून महापालिका कामगारांना मारहाण; कामगारांचा पालिकेवर मोर्चा
अहमदनगर : शहरातील झेंडीगेट परिसरात ड्रेनेजचे काम करत असताना महापालिकेच्या दोघा कामगारांना अपक्ष नगरसेवकाच्या पुत्राने मारहाण केली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात मुजाहीद कुरेशी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या नगरसेवक पुत्रावर कारवाई करावी, अन्यथा महापालिकेचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा देत मंगळवारी कामगारांनी महापालिकेवर मोर्चा काढला.
सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ याप्रकरणी चंद्रकांत दगडू चव्हाण (वय ५२ रा. कवडेनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. चव्हाण व त्यांचा सहकारी विजय भसुते हे सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास झेंडीगेट परिसरातील जुने नगर तालुका पोलीस ठाणे परिसरात ड्रेनेज दुरूस्तीचे काम करत होते. यावेळी मुजाहिद कुरेशी याने तेथे येऊन चांगले काम करत नसल्याचे म्हणत चव्हाण यांना मारहाण केली. या घटनेबाबत चव्हाण यांनी बंगाली चौक येथे उपस्थित महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक रामदीन व भोर यांना माहिती दिली.
यावेळी कुरेशी याने तेथे येऊन अधिका-यांसमोरच विजय भसुते यांना मारहाण केल्याचे चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुजाहिद कुरेशी हा अपक्ष नगरसेविका ख्वाजाबी कुरेशी यांचा पुत्र आहे. कुरेशी या राष्ट्रवादीच्या समर्थक आहेत. या नगरसेवक पुत्रावर कारवाई करावी, अन्यथा महापालिकेचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा देत मंगळवारी कामगारांनी महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, नगरसेवक दीप चव्हाण, मुद्दसर शेख, कामगार संघटनेचे सचिव आनंद वायकर आदींनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांना घेराव घालत कारवाईची मागणी केली.