घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांवर मनपाचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST2021-04-19T04:18:58+5:302021-04-19T04:18:58+5:30
अहमदनगर : कोरोनाबाधित रुग्णांना घरी थांबण्यास मनाई करण्यात आली असून, या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये ...

घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांवर मनपाचा वॉच
अहमदनगर : कोरोनाबाधित रुग्णांना घरी थांबण्यास मनाई करण्यात आली असून, या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी सात आरोग्य केंद्रांना प्रत्येकी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती माहपालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिली.
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेक रुग्ण घरी थांबतात. ते शहरात फिरतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रविवारी नगर शहरात ८४९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत; परंतु कोरोनाबाधित रुग्ण घरी उपचार घेत आहेत. शासनाने होम आयसोलेशनला परवानगी दिली आहे. मात्र, अनेक रुग्ण घरी न थांबता इतरत्र फिरतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला गेला. घरी उपचार घेणाऱ्यांना अटकाव करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेने सात आरोग्य केंद्रांना प्रत्येकी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. आरोग्य केंद्रातील कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांची यादी तयार करतील. यादीनुसार रुग्णांना रुग्णवाहिकेतून कोविड केअर सेंटरमध्ये आणले जाणार आहे.
महापालिकेने तीन कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत; परंतु रुग्णांचा कल खाजगी रुग्णालयांत उपचार घेण्याकडे आहे. लक्षणे नसलेले रुग्ण घरी उपचार घेत आहेत. घरी उपचार घेत असताना रुग्णांनी बाहेर पडू नये, असे आवाहन वेळोवेळी करण्यात येते; परंतु ही बाब रुग्ण गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे रुग्णांना मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचे आयुक्त गाेरे यांनी सांगितले.
....
नातेवाइकांनी संपर्क केल्यास शववाहिका देणार
जिल्हा रुग्णालयासाठी दोन शववाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय खाजगी रुग्णालयात मृत्यू झाल्यास नातेवाइकांनी महापालिकेत संपर्क करावा. नातेवाइकांनी संपर्क केल्यास तात्काळ शववाहिका उपलब्ध करून दिली जाईल, असे आयुक्त गोरे म्हणाले.