मनपाचे प्लाझ्मा, सीटी स्कॅन मशीन धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:21 IST2021-05-18T04:21:54+5:302021-05-18T04:21:54+5:30
अहमदनगर : महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील रक्तपेढीत असलेले प्लाझ्मानिर्मिती करणारे मशीन कर्मचाऱ्यांअभावी, तर सीटी स्कॅन मशीन जागेअभावी धूळ ...

मनपाचे प्लाझ्मा, सीटी स्कॅन मशीन धूळ खात
अहमदनगर : महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील रक्तपेढीत असलेले प्लाझ्मानिर्मिती करणारे मशीन कर्मचाऱ्यांअभावी, तर सीटी स्कॅन मशीन जागेअभावी धूळ खात पडून असल्याचे आरोग्य समितीने केलेल्या पाहणीतून समोर आले. ही मशिनरी तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना समितीकडून करण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांच्यासह सदस्य निखिल वारे, संजय ढोणे आदींनी सोमवारी कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील रक्तिपेढीला भेट दिली. यावेळी माहिती घेतली असता प्लाझ्मानिर्मिती करणारे मशिन लाखो रुपये खर्चून विकत घेण्यात आलेले आहे. परंतु, तांत्रिक कर्मचारी नसल्याने हे मशीन बंद आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्माची गरज भासते आहे. प्लाझ्मा मिळत असल्याने नातेवाइकांची धावपळ सुरू आहे. अशा संकटकाळातही जर महापालिकेच्या यंत्रणेचा सामान्य नागरिकांना उपयोग होणार नसेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. आरोग्य सुविधा मिळत नसल्याने रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. दुसरीकडे मशिनरी उपलब्ध असूनही त्याचा वापर होताना दिसत नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना जास्तीचे पैसे देऊन प्लाझ्मा विकत घ्यावे लागत आहे. तसेच कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सीटी स्कॅन करण्यास सांगितले जाते. ही तपासणी करण्यासाठी २,५०० ते ३,००० रुपये खर्च येतो. महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी सीटी स्कॅन मशीन खरेदी केले. परंतु, जागेअभावी हे मशीन धूळ खात पडून आहे. हे मशीन बसविले असते तर कोरोना रुग्णांची कमी खर्चात तपासणी करणे शक्य होते. परंतु, हे मशीन बंद असल्याने आरोग्य समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त करत याबाबत आयुक्तांशी चर्चा करून तातडीने मशिनरी सुरू करण्याची मागणी केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
..
१७-महापालिका ब्लड बँक