मनपाच्या मॉडेल रस्त्याला अडथळे अनेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:15 IST2021-06-19T04:15:01+5:302021-06-19T04:15:01+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : सावेडी उपनगरातील तोफखाना ते भिस्तबाग महाल हा रस्ता मॉडेल रस्ता म्हणून विकसित करण्यात येत ...

मनपाच्या मॉडेल रस्त्याला अडथळे अनेक
लाेकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : सावेडी उपनगरातील तोफखाना ते भिस्तबाग महाल हा रस्ता मॉडेल रस्ता म्हणून विकसित करण्यात येत आहे. या कामावर मनपाच्या बांधकाम विभागाचे नियंत्रण असले, तरी हा रस्ता महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रभागात येतो. त्यादृष्टीने सावेडी रस्त्याचा कामाला महत्त्व आहे. विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी त्यांच्या भागातील रस्त्याचे काम पूर्ण केले. उर्वरित तोफखाना ते भिस्तबाग चौकापर्यंतचे काम मात्र मध्येच रखडले असून, याकडे महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कानाडोळा केला आहे.
सावेडी उपनगरातील तोफखाना पोलीस चौकी ते भिस्तबाग महाल हा प्रमुख रस्ता आहे. या मार्गाचे रुंदीकरण करून डांबरीकरण करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. हे काम सुरू करण्यासाठी ठेकेदाराला एप्रिल २०१९ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. हे काम पूर्ण करण्यासाठी ४ महिन्यांची मुदत होती. ठेकेदाराने मुदतीत काम पूर्ण केले असते, तर जुलै २०१९ पर्यंत काम पूर्णही झाले असते. परंतु, या कामाचे अंदाजपत्रक तयार करताना अनेक त्रुटी राहिल्या. पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आली नाही, हे एक आश्चर्यच आहे.
रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाल्यानंतर पाण्याच्या लाइन स्थलांतरित करण्याच्या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या. हे काम वेळेत पूर्ण झाले नाही. विशेष म्हणजे ठेकेदाराने डांबरीकरण केल्यानंतर पाण्याची लाइन टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला. त्यात पुन्हा भूमिगत केबल टाकण्याचे काम मंजूर झाले. हे काम मंजूर झाल्यानंतर आधी केबल टाकून घेणे जरुरीचे होते. हे कामही डांबरीकरण झाल्यानंतर सुरू करण्यात आले. याचा अर्थ महावितरणचा ठेकेदार व महापालिकांना यांच्यात अजिबात समन्वय नव्हता. हा गोंधळ सुरू झाल्याने रस्त्याचे काम रखडले. भिस्तबाग चौकापर्यंत डांबर टाकून झाल्यानंतर अन्य जलवाहिन्या व केबल टाकण्याचे काम करण्यात येत आहे. यामुळे सगळाच गोंधळ उडाला. भिस्तबाग चौक ते भिस्तबाग महाल हा भाग प्रभाग क्रमांक १ मध्ये येतो. प्रभाग क्रमांक १ मधील रस्त्याच्या कामाचे योग्य नियोजन करून ते पूर्ण करण्यात आले. उर्वरित रस्त्याचे काम अपूर्ण असून, या कामाकडे नगरसेवकांचेही दुर्लक्ष झाले आहे.
.....
ठेकेदाराकडून नियमांची पायमल्ली
सावेडी रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला ४ महिन्यांची मुदत होती. मुदतीत काम पूर्ण न केल्यास ठेकेदारावर कारवाई होते. कामाच्या दर्जाबाबत शहर अभियंता सुरेश इथापे हे तडजोड करत नाहीत. त्यामुळे ठेकेदारही त्यांना वचकून राहतात. कुष्ठधाम रस्त्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराने मुदतीत काम पूर्ण केले नाही. निविदेतील अटी-शर्तींची ठेकेदाराने पायमल्ली केली. परंतु, गेल्या दीड वर्षात शहर अभियंत्यांनी ठेकेदारावर कुठलीही कारवाई केली नाही, हे विशेष.
.....
असे आहेत कामाचे टप्पे
तोफखाना पोलीस चाैकी ते गुलमोहर कॉर्नर
गुलमोहर काॅर्नर ते भिस्तबाग चौक
- भिस्तबाग चौक ते भिस्तबाग महाल
....
कुठे अडकले काम
तोफखाना पोलीस चौकी ते भिस्तबाग महाल रस्त्याचे ठेकेदाराने डांबरीकरण केले होते. हे काम केल्यानंतर महावितरणच्या ठेकेदाराने केबल टाकण्यासाठी रस्ता खोदला. त्यामुळे पुन्हा डांबरीकरण करण्यात येत आहे. परंतु, हे काम पक्के होणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
....
एकूण निधी
३ कोटी ४८ लाख रुपये
....
कामाची मुदत
४ महिने
.....