झाडाची फांदी अंगावर पडून मनपचा कर्मचारी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:21 IST2021-05-18T04:21:32+5:302021-05-18T04:21:32+5:30
अहमदनगर: तौक्ते चक्रीवादळामुळे वाहत असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नगर शहरातील गायकवाड मळा येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाची फांदी अंगावर ...

झाडाची फांदी अंगावर पडून मनपचा कर्मचारी जखमी
अहमदनगर: तौक्ते चक्रीवादळामुळे वाहत असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नगर शहरातील गायकवाड मळा येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाची फांदी अंगावर पडून महापालिकेचा एक कर्मचारी जखमी झाला. तसेच इतर चार ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प हाेती.
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळ घोंगावत आहे. त्याचे पडसाद नगर शहरासह जिल्ह्यातही उमटले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात सोसायट्याचा वारा वाहात आहे. वादळाच्या तडाख्यामुळे सोमवारी सकाळी गायकवाड मळा येथील रस्त्याच्या बाजूला असलेले झाड उन्मळून पडले. दरम्यान, महापालिकेचे कर्मचारी संजय जाधव हे सायकलवरून जात असताना त्यांच्या अंगावर झाड कोसळले. त्यामुळे ते जखमी झाले. उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बालिकाश्रम रोड परिसरातील पंपिंगस्टेशन भागात नवजीवन वसाहतीतील लिंबाचे मोठे झाड उन्मळून पडले. बायजाबाई सोसायटीतही दुपारी वादळी वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडले असून, अग्निशमन विभागाने घटनास्थळी जाऊन फांद्या तोडून रस्ता वाहतुकीसाठी माेकळा केला. याशिवाय नगर- औरंगाबाद महामार्गावरील वसंत टेकडी भागात मोठे झाड वाऱ्यामुळे उन्मळून पडले. झाडाच्या फांद्या तोडून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.
वादळी वाऱ्यामुळे गुलमोहर रोडवरील पारिजात चौकातील झाड एका बाजूला झुकले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा येत असून, समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर पडून विद्युत पुरवठा खंडित होत आहे. महापालिकेकडून तातडीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सोसाट्याचा वारा वाहात असल्याने लहान- मोठी झाडे उन्मळून पडल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.
...
- वादळी वाऱ्यामुळे सोमवारी सकाळपासून शहरातील चार ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे प्रकार घडलेले आहेत. एका ठिकाणी तर महापालिका कर्मचाऱ्याच्या अंगावर झाडाची फांदी पडल्याचा प्रकार घडला असून, झाडे पडल्याच्या सर्वाधिक तक्रारी आहेत.
- शंकर मिसाळ, अग्निशमन विभागप्रमुख
..
फोटो