Coronavirus: कोविडचे नियम धुडकावत आरोग्य अधिकारी पार्टीत दंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 10:46 IST2021-05-29T10:45:22+5:302021-05-29T10:46:22+5:30
Coronavirus: सामान्य नागरिकांना रस्त्यावर फिरू न देणारे महापालिकेचे आयुक्त या पार्टीवर काय कारवाई करणार याची उत्सुकता आहे.

Coronavirus: कोविडचे नियम धुडकावत आरोग्य अधिकारी पार्टीत दंग
अहमदनगर - महापालिकेत आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याने कोविडचे सर्व नियम धुडकावत वाढदिवसाची पार्टी साजरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सामान्य नागरिकांना रस्त्यावर फिरू न देणारे महापालिकेचे आयुक्त या पार्टीवर काय कारवाई करणार याची उत्सुकता आहे.
महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे एका निवासस्थानी चक्क ‘एक हसीना थी’ हे गाणे तालासुरात गाताना या व्हिडिओत दिसत आहेत. लॉकडाऊनचे सर्व नियम तोडून काही महिला व पुरुष या पार्टीत सहभागी झालेले दिसतात. काहींच्या गळ्यात मास्क नावापुरता असून हा कोविड काळातीच व्हिडिओ आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. काही नागरिकांनी तो महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही पाठविला आहे. या अधिकाऱ्याने स्वत:च्या दालनातही गाणे गातानाचा एक व्हिडिओ शूट केला आहे. त्यात हा अधिकारी ‘पल पल दिल के पास रहती थी’ असे भलतेच रोमॅंटिक गाणे गाताना दिसत आहे. याही व्हिडिओत त्याच्या टेबलवर बुके दिसत असून हे दोन्ही व्हिडिओ एकाच दिवशीचे आहेत. कोविड काळात नागरिकांचे आरोग्य जपणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. मात्र, महापालिकेचे आरोग्य अधिकारी गाणे व पार्टीत दंग आहेत.