सुपा एमआयडीसीत कोरोनाची एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:21 IST2021-04-01T04:21:47+5:302021-04-01T04:21:47+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये कोरोनाने एन्ट्री केली आहे. विस्तारित औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमधील काही कामगार, राष्ट्रीयीकृत बँक, ...

सुपा एमआयडीसीत कोरोनाची एन्ट्री
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये कोरोनाने एन्ट्री केली आहे. विस्तारित औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमधील काही कामगार, राष्ट्रीयीकृत बँक, कनिष्ठ महाविद्यालयीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
पहिल्या टप्प्यात सेंट्रल बँकेचे कर्मचारी कोरोना बाधित आढळले. त्यानंतर स्टेट बँकेचे कर्मचारीही कोरोनाबाधित आढळले होते. त्यानंतर बँकांमध्ये खबरदारी घेण्यात येत आहे. सेंट्रल बँकेत गर्दी कमी करण्यासाठी टोकन पद्धतीचा अवलंब केला गेला. आतली गर्दी कमी झाली. मात्र, बाहेर ग्राहकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविल्याचे शाखाधिकारी अशोक नागरगोजे यांनी संगितले. वारंवार सूचना देऊनही ग्राहक संयम, शिस्त पाळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
स्टेट बँक शाखेत पहिल्या टप्प्यात एक अधिकारी कोरोना बाधित आढळले. त्यावेळी शाखा काही दिवस बंद होती. आता दुसरे अधिकारी बाधित आढळल्यानंतर खबरदारीच्या सर्व गोष्टी पाळून ग्राहकांची गैरसोय नको म्हणून बँकेचे कामकाज सुरू ठेवण्यात आल्याचे शाखा व्यवस्थापक मंगेश गुंड यांनी सांगितले.
विस्तारित औद्योगिक वसाहतीत मोठमोठ्या कंपन्या असून तेथेही काही ठिकाणी प्रशासकीय अधिकारी तर काही ठिकाणी कामगार कोरोना बाधित आढळले. एकट्या मिंडा कंपनीत पाच कोरोना बाधित आढळल्याचे सांगण्यात आले. त्यास आरोग्य विभागाकडून दुजोरा मिळाला आहे. संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी संपर्कातील सर्व लोकांना तपासणी करून घेण्याबाबत सूचना दिल्याचे सांगितले.
विस्तारित एमआयडीसीच्या कारखान्यातील बरेचसे कामगार शिरूर, वाघोली, पुणे, नगर या शहरी भागासह सुप्यातूनही येतात. या भागात दुसऱ्या टप्प्यात रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाहेरून येणारे कामगार दररोज ये-जा करताना स्थानिक ठिकाणी ते वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येतात. त्यातून कोरोनाबाधित झाल्यास याबाबत शासकीय आरोग्य यंत्रणेला सूचना न देता काही जण खासगी दवाखान्यात उपचार घेतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील लोकांची तपासणी होत नाही. पर्यायाने रुग्णही वाढत आहेत. कनिष्ठ महाविद्यालयातील एक अध्यापक पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास येताच हा विभाग बंद करण्यात येऊन विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली.
---
खासगी डॉक्टरांनी कोरोना बाधितांची माहिती द्यावी..
काही जण कोरोना बाधित झाल्यानंतर आरोग्य विभागाला माहिती न देता खासगी दवाखान्यात उपचार घेतात. ही माहिती लपवल्याने कोरोनाचा प्रसार रोखणे अवघड जाते. त्यामुळे किमान खासगी दवाखान्यात उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ही माहिती आरोग्य विभागास देणे गरजेचे असल्याचे रूई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी गुंजाळ यांनी सांगितले. काेरोना बाधितांबाबत ना कारखाना व्यवस्थापन कळविते, ना खासगी उपचार करणारे डॉक्टर यामुळे रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्यांची संख्या वाढून रोगाचा प्रसार झपाट्याने वाढू शकतो, अशी भीती समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विद्या बारवकर यांनी व्यक्त केली.