मे महिन्यातील लग्न सोहळ्यांना कोरोनाचा ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:09 IST2021-05-04T04:09:54+5:302021-05-04T04:09:54+5:30
शेवगाव : कोरोनाने अनेकांच्या लग्न सोहळ्यावर विघ्न आणल्याने नव्या जीवनात पदार्पणासाठी विवाहेच्छुकांना लॉकडाऊन नंतरच्या नव्या मुहूर्ताची प्रतीक्षा करावी लागणार ...

मे महिन्यातील लग्न सोहळ्यांना कोरोनाचा ‘ब्रेक’
शेवगाव : कोरोनाने अनेकांच्या लग्न सोहळ्यावर विघ्न आणल्याने नव्या जीवनात पदार्पणासाठी विवाहेच्छुकांना लॉकडाऊन नंतरच्या नव्या मुहूर्ताची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, वाढलेल्या लॉकडाऊनमुळे अगोदर ठरलेल्या मुहूर्तानुसार लग्नपत्रिका़, वाजंत्री, हॉल, आचारी, कपडे, दागिने आदींची अगोदर केलेली बुकिंग अनेकांनी रद्द केली आहे. तर काहींनी समयसूचकता दाखवित विवाह समारंभात होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत, नवीन पायंडा पाडून कमी लोकांमध्ये विवाह सोहळा उरकून घेतला आहे.
एरव्ही विवाह सोहळ्यात होणारे रुसवे-फुगवे, रुढी-परंपरांना फाटा देऊन, चांगला पायंडा समाजामध्ये रूजवताना मोजक्याच लोकांना आमंत्रित करून लॉकडाऊन काळात काहींनी पुढील मुहूर्ताची प्रतीक्षा न करता, ‘शुभमंगल सावधान’ सावधानता राखून पार पाडले आहेत. कोरोना काळातील निर्बंध पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये होणारे लग्न सोहळे चांगली संकल्पना, पायंडा असल्याची भावना अनेक मंडळी व्यक्त करीत आहेत.
यावर्षी लग्नाचे सर्वाधिक मुहूर्त मे महिन्यात येत आहेत. चालू वर्षात फेब्रुवारी आणि मार्चमध्ये लग्नासाठी मुहूर्त नसल्याने अनेकांनी मे महिन्यातील मुहूर्ताला प्राधान्य देत विवाह निश्चित केले होते. २२ एप्रिलपासून लग्नाचे मुहूर्त सुरू झाले आहेत. वास्तविक १२ मे पासून वैशाख महिना सुरू होणार आहे. वैशाख व ज्येष्ठ हे महिने विवाह मुहूर्तासाठी सर्वोत्तम मानले जातात. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन पडला अन् इच्छुकांचा हिरमोड झाला. ठरलेल्या मुहूर्तावर लग्न करायचे ठरल्यास कोरोना काळातील निर्बंध पाळून शुभमंगल सावधानता बाळगून कमी लोकांच्या उपस्थितीत हौसेला मुरड घालून करावे लागणार आहेत. अथवा लॉकडाऊन नंतर निघणाऱ्या मुहूर्ताची वाट पहावी लागणार आहे.
--
मे महिन्यात लग्नाच्या तारखा..
१, २, ३, ४, ५, ८, १३, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१. यासह जून महिन्यात ८ मुहूर्त आहेत.
---
व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका..
लग्न म्हटले की मंगल कार्यालय, आचारी, बँडबाजा, घोडा, वाहने आदींचे अगोदरच बुकिंग करावी लागते. तर लग्नपत्रिका, कपडेलत्ते, भांडीकुंडी, फर्निचर, दागदागिने यासह रुखवत आदी वस्तू लग्न मुहूर्तापूर्वी काही दिवस अगोदर खरेदी कराव्या लागतात. मात्र, लॉकडाऊनमुळे आलेली बंधने, त्यात साधेपणाने उरकले जाणारे लग्न सोहळे यामुळे संबंधित व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून त्यांची वार्षिक आर्थिक गणिते बिघडली आहेत.