कोरोनाची साथ कमी झाली; डेंग्यू-मलेरियाही गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:07+5:302021-06-10T04:15:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाची साथ कमी झाली. आता पावसाळा सुरू झाल्यामुळे डेंग्यू-मलेरिया, चिकुन गुन्यासारखे आजार वाढण्याची ...

कोरोनाची साथ कमी झाली; डेंग्यू-मलेरियाही गायब
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाची साथ कमी झाली. आता पावसाळा सुरू झाल्यामुळे डेंग्यू-मलेरिया, चिकुन गुन्यासारखे आजार वाढण्याची भीती आहे. मात्र सुदैवाने आतापर्यंत डेंग्यू-मलेरिया या साथीच्या आजाराचे फारसे रुग्ण आढळून आले नाहीत. चिकुन गुन्याचे ११ रुग्ण आढळले असून, त्यांची तब्येत पुन्हा ठणठणीत झाली असून, डेंग्यूचा फक्त एकच रुग्ण आढळला आहे. कोरोनासोबत यंदा डेंग्यू-मलेरियाही गायब झाल्याचे सध्या तरी दिसत आहे.
दरवर्षी जूनमध्ये पावसाळा सुरू होतो. अनेक भागात पाण्याचे डबके साचले जाते. त्यात डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूसारखे आजार डोके वर काढतात. त्यामुळे हिवताप कार्यालयाकडून जागृतीही केली जाते. गत दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. जून महिना सुरू होताच कोरोना कमी झाला आहे. त्यामुळे आता डेंग्यूसारख्या आजारांशी सामना करण्याची तयारीही प्रशासनाला ठेवावी लागते. मात्र सध्या असे कोणतेही आजार जिल्ह्यात आढळून आलेले नाहीत. तरीही डेंग्यू-मलेरियासारखे आजार होणार नाहीत यासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके यांनी जागृती करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. १ जूनपासून जिल्ह्यात २६ संशयितांचे रक्त तपासले असता एकाला डेंग्यू झाल्याचे आढळून आले असून, त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
दरवर्षी जून महिन्यात हिवताप व इतर कीटकजन्य आजारांविषयी जनतेमध्ये जागृती केली जाते. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत नियमांचे पालन करून साथीच्या रोगांबाबत जागृती करण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाल्याने आपल्या अवतीभोवती, परिसरात डास होणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार करण्यासाठी जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- डॉ. दादासाहेब साळुंके, जिल्हा हिवताप अधिकारी.
-------------------
अशी आहे आकडेवारी
वर्ष रक्त नमुने डेंग्यू डेंग्यूने मृत्यू चिकुन गुन्या हिवतापासाठी रक्त नमुने रुग्ण मृत्यू
२०१९ १४४० ३५९ ० ९ ४,८२,१३२ २ ०
२०२० ११५ ७ ० ३१ ६,४०,०९९ ४ ०
२०२१ २६ २ १ ११ १,९५,३७१ ० ०
(९ जूनपर्यंत)
--------------------
ही घ्या काळजी
१) आपल्या परिसरात किंवा घराभोवती पाणी साठवू देऊ नका. डबकी बुजवा किंवा वाहती करा. साठलेल्या पाण्यावर रॉकेल टाका, डासांच्या अळ्या खाणारे गप्पी मासे डबक्यात सोडा
२) झोपताना मच्छरदानीचा वापर करा. घराच्या खिडक्यांना बारीक जाळी बसवा. हात-पाय झाकले जातील असे अंगभर कपडे वापरा
३) दर आठवड्याला घरातील पाण्याची भांडी रिकामी करा. पाण्याची भांडी स्वच्छ घासून, पुसून घ्या, घरातील पाण्याच्या टाक्यांना झाकण लावा
४) कोणत्याही तापाकडे दुर्लक्ष करू नका. ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, ताप आल्यास रक्ताची तपासणी करा.
--------------------------
डासांची उत्पत्ती स्थाने
हिवतापाचा डास : स्वच्छ पाण्याची डबकी, विहिरी, तलाव, झिरपलेले पाणी, भातशेती, इमारतीवरील टाक्या, बंद कारंजे
हत्तीरोग : घाण पाण्याची डबकी, गटारे, सेप्टी टँक
डेंग्यू, चिकुन गुन्या : साठलेले स्वच्छ पाणी, कृत्रिमरीत्या साठविलेले पाणी, निरोपयोगी वस्तू, टायर, नारळांच्या करवंट्या
मेंदुज्वर : भातशेतीतील स्वच्छ पाणी, पान वनस्पती असलेले तलाव, नदी आदी.
-------------
डमी आहे.