नगर तालुक्यात कोरोनाचा पुन्हा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:27 IST2021-02-26T04:27:07+5:302021-02-26T04:27:07+5:30

केडगाव : नगर तालुक्यात कोरोनाची सेकंड इनिंग सुरू झाली असून गावोगावी कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने चिंता वाढली आहे. ...

Corona wreaks havoc in Nagar taluka | नगर तालुक्यात कोरोनाचा पुन्हा कहर

नगर तालुक्यात कोरोनाचा पुन्हा कहर

केडगाव : नगर तालुक्यात कोरोनाची सेकंड इनिंग सुरू झाली असून गावोगावी कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यात आतापर्यंत ३ हजार ६१४ रूग्ण झाले आहेत. यात दररोजचे ७ ते ८ नव्या रूग्णांची भर पडत आहे. सध्या तालुक्यात ५० सक्रिय रूग्ण आहेत.

नगर तालुक्यात कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र सध्या कोरोनाचा पुन्हा कहर सुरू झाल्याने तालुका प्रशासनाबरोबर सर्वसामान्यांची ही चिंता वाढली आहे.

तालुक्यात आतापर्यंत ३ हजार ६१४ जणांना कोरोनाची लागण झाली असून दररोजची त्यात ७ ते ८ रूग्णांची नव्याने भर पडत आहे. मागील आठवड्यात तर रोजची रूग्ण संख्या १५ पर्यंत गेली होती. सध्या तालुक्यात ५o रूग्ण सक्रिय आहेत.

तालुक्यातील माध्यमिक शाळा, गावोगावचे आठवडे बाजार, भाजी बाजार सुरू झाले आहेत. यामुळे सोशल डिस्टंटचा फज्जा उडत आहे. अनेक जण मास्क न वापरतात गावात फेरफटका मारतात. यामुळे कोरोनाची भीती आणखीनच वाढली आहे.

----

पुन्हा कोविड सेंटर सुरू करावे लागतील

रूग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर तालुक्यात पुन्हा कोविड सेंटर सुरू करावे लागणार आहे. आरोग्य विभागाने जागेची शोधाशोध सुरू केली आहे. गावोगावी दवंडी व इतर माध्यमातून जनजागृती केली जात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे यांनी सांगितले.

---

वाळकीत कोरोनाचे नव्याने रूग्ण

वाळकीत कोरोनाचे नव्याने १२ रूग्ण आढळले आहेत. देऊळगाव, अरणगाव, रूईछत्तीसी, वडगाव तांदळी आदी ठिकाणी कोरोनाचे नवे रूग्ण सापडत असल्याने वाळकी परिसरात दुसऱ्यांदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

----

जेऊरचा आठवडे बाजार बंद

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारी म्हणून जेऊर गावचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये घेण्यात आला. जेऊर गावामध्ये दर शनिवारी आठवडे बाजार भरत असतो. जेऊर परिसरातील जवळपास आठ ते दहा गावांनी आठवडे बाजार भरत नसल्याने त्यांना एकमेव जेऊर हाच आठवडे बाजार असतो. त्यामुळे जेऊरला बाजारच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये घेण्यात आला.

Web Title: Corona wreaks havoc in Nagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.