कोपरगावात सर्वपक्षीय युवकांनी सुरू केली कोरोना वॉररूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:21 IST2021-05-07T04:21:52+5:302021-05-07T04:21:52+5:30
कोपरगाव : शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यासाठी रुग्णांसह नातेवाइकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसचे ...

कोपरगावात सर्वपक्षीय युवकांनी सुरू केली कोरोना वॉररूम
कोपरगाव : शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यासाठी रुग्णांसह नातेवाइकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार संजय पोटे यांच्या पुढाकारातून सर्वपक्षीय युवकांना एकत्र आणत कोपरगाव येथे वॉररूम सुरू केली आहे. या वॉररूमच्या माध्यमातून गरजूंना चांगलीच मदत होत आहे.
तालुक्याच्या सेवेसाठी, रुग्णांची मदत म्हणून वैद्यकीय सुविधा देण्यासाठी एक हेल्पलाइन आणि वॉररूम सुरू केली आहे. एक पाऊल मातृभूमीसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन आपल्या गावच्या लोकांसाठी काम करायला अनेक युवकांनी स्वतःहून सहभाग घेतला आहे. पोटे हे गत दशकापासून युवक काँग्रेसच्या चळवळीत जोडले गेले असल्याने सामजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असतात. त्यांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, खासदार राजीव सातव यांच्यासह कोपरगाव येथील राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, आमदार आशुतोष काळे, युवा नेते विवेक कोल्हे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, युवा उद्योजक संग्राम देशमुख व सर्व राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रांतील विविध तज्ज्ञांचे सतत मार्गदर्शन मिळत आहे.
.............
कोपरगाव तालुक्यात कोरोना रोखण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर्स मिळत नाही, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे, खासगी हॉस्पिटलमध्ये लूट सुरू असून वेळेत रुग्णवाहिकादेखील मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.
- तुषार पोटे, जिल्हा उपाध्यक्ष, युवक काँग्रेस, कोपरगाव
...........