कोरोनाच्या लसीला....नगरसेवकांचा वशिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:22 IST2021-05-07T04:22:09+5:302021-05-07T04:22:09+5:30

अहमदनगर : कोरोनावरील लसीचा आधीच तुटवडा असताना आता त्यात १८ वर्षांवरील तरुणांच्या गर्दीची भर पडली आहे. एकीकडे लस उपलब्ध ...

Corona vaccine .... Corporator's vassal | कोरोनाच्या लसीला....नगरसेवकांचा वशिला

कोरोनाच्या लसीला....नगरसेवकांचा वशिला

अहमदनगर : कोरोनावरील लसीचा आधीच तुटवडा असताना आता त्यात १८ वर्षांवरील तरुणांच्या गर्दीची भर पडली आहे. एकीकडे लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असल्याने आरोग्य केंद्रावरून ज्येष्ठांना माघारी जावे लागत आहे. आज किती जणांना, कोणत्या केंद्रावर, कोणत्या वयोगटाला, कोणती लस मिळणार आहे, याबाबतचे महापालिकेकडे कोणतेही नियोजन नसल्याने अहमदनगर शहरात लसीकरणाचा एकच गोंधळ उडाला आहे. त्यामुळे विनाकारण आरोग्य केंद्राबाहेर रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. त्यात नगरसेवकांनी फोन करून पाठविलेल्या नागरिकांना लगेच लस दिली जात असल्याचे चित्रही नगरमध्ये पहायला मिळत आहे.

एक मेपूर्वी ४५च्या पुढील वयोगटाला लस दिली जात होती. एक मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटाला लस देण्याची घोषणा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात झाली. त्या वेळेपासून लस मिळते की नाही, याची शंका असल्याने ४५च्या पुढील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी सुरू केली. प्रत्येक केंद्रावर सकाळपासूनच रांगा लागत होत्या. त्यात एक मेपासून नगर जिल्ह्यातही १८ ते ४४ वयोगटाला लसीकरण सुरू झाले. या वयोगटासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली. नोंदणी केली तरी लस उपलब्ध झाल्याशिवाय शेड्युल मिळत नाही. त्यामुळे लस मिळणार की नाही, हे पाहण्यासाठी तरुणांचीही लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. ज्यांना शेड्युल मिळाले आहे किंवा आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशांची यादीही आरोग्य केंद्राबाहेर लावली जाते. तसेच याबाबत मोबाईलवरही माहिती दिली जाते. तरीही यादीत नाव येते का, हे पाहण्यासाठी ज्येष्ठांची गर्दी होत आहे. तसेच कोणत्या केंद्रावर कोणाला लस मिळणार, याची माहिती नसल्याने शहरातील सर्वच केंद्रांवर लसीकरणासाठी गर्दी होत आहे. भरउन्हात नागरिकांना लसीकरणासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. एका रांगेत असलेल्या ४० ते ५० जणांना लस दिली जाते, त्यानंतर लस संपल्याची घोषणा होते. त्यानंतर दोन ते तीन तास रांगेत उभे असलेले नागरिक संताप व्यक्त करीत घरी निघून जातात. दुसऱ्या दिवशी पुन्हा हीच परिस्थिती तयार होते.

लस आहे का हे विचारण्यासाठी दिवसभर नागरिक, महिला आरोग्य केंद्रावर येतात. दरम्यान, नगरसेवक आरोग्य केंद्रावरील अधिकारी, नर्सेस यांना थेट फोन करून वाॅर्डातील नागरिकांना लस देण्यास सांगतात. त्यांच्यासाठी काही लसी राखीव ठेवल्या जातात. असे लसीकरण दुपारनंतर केले जाते. लसीकरण सर्वांना समन्यायी पद्धतीने मिळाले तर मग अशी वशिलेबाजी करण्याची काय गरज, असा सवाल नागरिक करीत आहेत.

--------------

शेड्युल घेताना येतात अडचणी....

१) कोविन ॲपवर किंवा वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागते

२) ओळखपत्राची माहिती, वय भरल्यानंतर लसीकरणासाठी नोंदणी होते.

३) लसीकरणासाठी नोंदणी झालेला मेसेज आपण नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकावर येतो.

४) त्यानंतर लसीकरणासाठीचे शेड्युल घ्यावे लागते. या शेड्युल घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

….………………

टाइम स्लॉट मिळण्यास विलंब

शेड्युल घेताना केडगाव आरोग्य केंद्रावर टाइम स्लॉट मिळत नाही. त्यामुळे अपाइंटमेंट कन्मर्फ होत नाही. पर्यायाने शेड्युल मिळत नाही. या केंद्रावर ३०० लसींची उपलब्धता असल्याचे गेल्या तीन दिवसांपासून दाखवले जाते. पण, प्रत्यक्षात शेड्युल मिळत नाही. लसची उपलब्धता ॲपवर सातत्याने दिसते. पाच मिनिटांनंतर हे बुकिंग हाऊसफुल्ल झालेले असते.

….……………..

शहरातील इतर केंद्रांवर शेड्युल घेण्यासाठी वेळ ठरवून दिलेला नाही. लसींचा साठा कधीही ॲपवर अपलोड केला जातो. त्यामुळे सतत डोळे लावून ॲपवर बसावे लागते.

….………….

गुरुवारची परिस्थिती

गुरुवारी (६ मे) दुपारी चार वाजल्यानंतर नागापूर आरोग्य केंद्र आणि जिजामाता आरोग्य केंद्रावर लस उपलब्ध असल्याचे ऑनलाइन दाखवत होते. काही क्षणात येथील शेड्युल संपले. कोविन ॲपवर किंवा वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागते. ओळखपत्राची माहिती, वय भरल्यानंतर लसीकरणासाठी नोंदणी होते.

लसीकरणासाठी नोंदणी झालेला मेसेज आपण नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकावर येतो. त्यानंतर लसीकरणासाठीचे शेड्युल घ्यावे लागते. या शेड्युल घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील इतर केंद्रांवर गुरुवारी संध्याकाळच्या साडेसात वाजेपर्यंत लस उपलब्ध नव्हती.

--

फोटो-०५ लसीकरण

नगर शहरातील लसीकरण केंद्रावरील गुरुवार, दि. ६ मे रोजी संध्याकाळी ७.०५ वाजताची ही परिस्थिती.

Web Title: Corona vaccine .... Corporator's vassal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.