आता १६५ केंद्रांवर होणार कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:21 IST2021-04-02T04:21:24+5:302021-04-02T04:21:24+5:30
नगर जिल्ह्यासह देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली. सुरुवातीला केवळ आरोग्य कर्मचारी, तसेच फ्रंटलाइन वर्कर यांनाच ...

आता १६५ केंद्रांवर होणार कोरोना लसीकरण
नगर जिल्ह्यासह देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली. सुरुवातीला केवळ आरोग्य कर्मचारी, तसेच फ्रंटलाइन वर्कर यांनाच लस दिली जात होती. त्यावेळी जिल्ह्यात केवळ १५ ते २० लसीकरण केंद्रे होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिक, तसेच व्याधिग्रस्त ४५ वर्षांवरील नागरिक यांना लस देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर जिल्ह्यात कोरोना लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून ती १०७ करण्यात आली.
परंतु, शासनाने पुन्हा १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्याच्या सूचना दिल्याने नगर जिल्ह्यात केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. सध्या जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, महापालिका तसेच खासगी ३३ रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे आहेत. त्यातून आतापर्यंत दोन लाख एक हजार ५८८ लोकांना लस दिली आहे. त्यामध्ये दीड लाख डोस ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील लोकांना दिले आहेत.
-----------------
अशी आहेत लसीकरण केंद्रे
जिल्हा रुग्णालय - १
उपजिल्हा रुग्णालय - २
ग्रामीण रुग्णालय - २३
प्राथमिक आरोग्य केंद्र - ९६
महापालिका - ०९
कॅन्टोन्मेंट - ०१
खासगी दवाखाने - ३३
--------------
एकूण १६५
--------------
अजून ५४ हजार डोस दाखल
जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. काही केंद्रांवर लसीचा तुटवडा होता. त्यानंतर ३१ मार्च रोजी ५४ हजार ७०० डोस जिल्हा परिषदेला प्राप्त आले. त्यानंतर लगेच ते डोस संबंधित केंद्राला पोहोच करण्यात आले आहेत. दरम्यान, आतापर्यंत दोन लाख ५७ हजार ९६० कोविशिल्ड, तर ४१ हजार २६० कोव्हॅक्सिन असे एकूण दोन लाख ९९ हजार २२० डोस प्राप्त झाले आहेत.