कोरोना तपासणी कीट संपले, लसीचा तुटवडा अन् बळींचा आकडा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:09 IST2021-05-04T04:09:58+5:302021-05-04T04:09:58+5:30
श्रीगोंदा : शहरासह तालुक्यातील कोरोनाची लाट तोडण्यासाठी प्रशासन व नागरिक शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, कोरोना तपासणी कीट ...

कोरोना तपासणी कीट संपले, लसीचा तुटवडा अन् बळींचा आकडा वाढला
श्रीगोंदा : शहरासह तालुक्यातील कोरोनाची लाट तोडण्यासाठी प्रशासन व नागरिक शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, कोरोना तपासणी कीट संपले आहेत. त्यामुळे तपासणी ठप्प असून बळींचा आकडा वाढत आहे. त्यातच कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असून लसीचाही तुटवडा आहे.
तालुक्यात कोरोनाने दोन मे अखेर १२६ बळी घेतले आहेत. दुसऱ्या लाटेत तालुक्यात ८१ बळी घेतले आहेत. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये सदाशिवराव पाचपुते, सतीश पोखर्णा, संतोष खेतमाळीस, बाळासाहेब शेंडगे यांच्यासारखे अनेक मोहरे गमावले आहेत. अनेक कुटुंबे कोरोनाशी झुंज देत आहेत. तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. शासकीय रुग्णालयात कोरोना तपासणी ठप्प आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या पुढे येण्यात अडचणी येत आहेत.
त्यातच गेल्या तीन महिन्यांत अवघ्या १५ हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. तीन तीन दिवस तालुक्याला लस मिळत नाही. त्यामुळे नागरिक लसीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाबाहेर रांगा लावून पुन्हा घरी जात आहेत. नागरिकांची ही गर्दी कोरोनाला निमंत्रण देणारी ठरत आहे. मात्र, याकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे.
तालुक्यात आतापर्यंत ६ हजार ७४८ जणांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये ५ हजार ७७६ जणांनी कोरोनावर मात केली. ८४६ जण कोरोनाशी झुंज देत आहेत. पहिल्या लाटेत तालुक्यात ३ हजार ९१३ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. यामध्ये ४५ जणांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या लाटेत २ हजार ८३५ जणांना कोरोनाची बाधा झाली असून यामध्ये ८१ जणांचा बळी गेला आहे.
--
मोफत उपचार करणारी कोविड सेंटर अशी..
ग्रामीण रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वसतिगृह, छत्रपती काॅलेज मुलींचे वसतिगृह, संत शेख महंमद महाराज कोविड सेंटर सर्व श्रीगोंदा,
कर्मवीर भाऊराव पाटील कोविड सेंटर कोळगाव,
श्री व्यंकनाथ कोविड सेंटर लोणी व्यंकनाथ, सिध्देश्वर कोविड सेंटर आढळगाव,
शिवशंभो कोविड सेंटर घारगाव, चांडेश्वर कोविड सेंटर चांडगाव, हंगेश्वर कोविड सेंटर चिंभळे,
पद्मभूषण अण्णासाहेब हजारे कोविड सेंटर देवदैठण, सिध्देश्वर कोविड सेंटर लिंपणगाव.
......
आमचे उख्खलगाव छोटेसे गाव आहे. मात्र, येथे कोरोनाने अनेकांचा जीव घेतला आहे. येथे आवश्यकतेनुसार कोरोना चाचणी होत नाही. त्यामुळे कोरोना झालेले रुग्ण समजत नाहीत. त्यामुळे नागरिक आणखी भयभीत होत आहेत. त्यामुळे शासनाने कोरोना चाचणी आणि लसीकरण जलद करणे गरजेचे आहे.
-प्रा. संजय लाकुडझोडे,
उख्खलगाव
---
०३ श्रीगोंदा कोरोना
श्रीगोंदा येथील सांस्कृतिक भवनात कोरोना प्रतिबंधक लसीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती.