कोरोना- डेंग्युची लक्षणे सारखीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST2021-07-26T04:20:28+5:302021-07-26T04:20:28+5:30
------------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या सातशेपार जात आहे. ग्रामीण भागाबरोबरच नगर शहरातही रुग्ण ...

कोरोना- डेंग्युची लक्षणे सारखीच
-------------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या सातशेपार जात आहे. ग्रामीण भागाबरोबरच नगर शहरातही रुग्ण वाढले आहेत. दुसरीकडे पावसाळा सुरू झाला असल्याने, डेंग्यूची धास्तीही प्रशासनाने घेतली आहे. सुदैवाने जिल्ह्यात जुलै महिन्यात एकही डेंग्यूचा रुग्ण आढळला नसल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. मात्र, कोरोना आणि डेंग्यूची लक्षणे सारखीच असल्याने दुखणे अंगावर काढणे धोक्याचे ठरू शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
कोरोना आणि डेंग्यूची लक्षणे सारखी असल्याने नेमकी तपासणी कशाची करावी, असाही प्रश्न नागरिकांसमोर आहे. त्यामुळे ताप आला, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तपासणी करून उपचार करण्याचे आवाहन प्रशासकीय यंत्रणेने केले आहे. याबाबत नागरिकांनीही काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.
------------
कोरोना आणि डेंग्यूची काही लक्षणे सारखीच असली, तरी चाचण्या वेगवेगळ्या आहेत. सध्या जिल्ह्यात एकही डेंग्यूचा रुग्ण नाही, तसेच डेंग्यूचा बळीही गेलेला नाही. सध्या डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी ग्रामीण भागात उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ.दादासाहेब साळुंके, जिल्हा हिवताप अधिकारी
----------------
वेगवेगळी चाचणी
कोरोना- अँटिजन, आरटीपीसीआर
डेंग्यू- एलायझा चाचणी
-----------
सर्दी, खोकला, ताप
अंग लाल होणे, लघवी व नाकातून रक्त येणे, थंडी वाजणे, एक दिवसाआड ताप येणे, उच्च ताप येणे, उलटी मळमळ, लाल डोळे होणे, हाताचे तळवे लाल दिसणे ही डेंग्यूची लक्षणे आहेत.
ताप, श्वास घेण्यास त्रास, सर्दी, खोकला, दम लागणे, सहा मिनिटे वॉक केल्यानंतर धाप लागणे, ही कोरोनाची लक्षणे आहेत.
---------------------
डासांपासून सावध रहा
आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे, डासांची उत्पत्ती रोखणे, घराभोवती व परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचू न देता वाहते ठेवणे, छतावरही पाणी साचू न देणे, नारळ, करवंट्या, प्लास्टीकचे कंटेनर नष्ट करणे अशी काळजी घेणे गरजेचे आहे. थोडाही त्रास झाल्यास डॉक्टरांच्या सल्ला घ्यावा, असे जिल्हा आरोग्य यंत्रणेने आवाहन केले आहे.
-----------
डेंग्यूचे रुग्ण
२०१९-३५९
२०२०-७
२०२१-४
-----------
-----------