कोरोनाला अवैध दारूचा बुस्टर, चितळीत मृत्यूचे तांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:18 IST2021-05-17T04:18:44+5:302021-05-17T04:18:44+5:30
श्रीरामपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यातही चितळी गावात अवैध दारूविक्री सुरू राहिली. त्याच्याच परिणाम म्हणून कोरोनाने गावात अक्षरशः थैमान ...

कोरोनाला अवैध दारूचा बुस्टर, चितळीत मृत्यूचे तांडव
श्रीरामपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यातही चितळी गावात अवैध दारूविक्री सुरू राहिली. त्याच्याच परिणाम म्हणून कोरोनाने गावात अक्षरशः थैमान घातले. तब्बल चारशेहून अधिक ग्रामस्थ संक्रमित झाले तर ४४ जणांचा मृत्यू झाला. अखेर आरोग्य यंत्रणेला ९० टक्के ग्रामस्थांची कोरोना चाचणी करावी लागली, तेव्हा कुठे परिस्थिती नियंत्रणात आली.
राहाता तालुक्यातील चितळी गावात अवघ्या पंधरा दिवसांमध्ये कोरोनाने कहर केला. गावातील प्रत्येक कुटुंबाने जिव्हाळ्याचा माणूस गमावला आहे. अनेकांना राहता, शिर्डी, श्रीरामपूर, औरंगाबाद, नाशिक येथील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज द्यावी लागली. त्यामुळे ग्रामस्थ अक्षरशः सुन्न झाले आहेत.
श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चितळीत कोरोनाच्या लाटेत दारूविक्री सुरू राहिली. त्यामुळे शेजारच्या गावातील व इतर तालुक्यातील तळीरामांचा येथे वावर सुरू राहिला व त्यामुळेच घात झाला, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रारंभी कोरोनाची लक्षणे असूनही ग्रामस्थांनी चाचणी करण्यास नापसंती दाखवली. त्याऐवजी स्थानिक खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू ठेवले. त्यामुळे परिस्थिती अचानक हाताबाहेर गेली व अनेक कुटुंब बाधित झाली, अशी माहिती वाकडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती घोगरे यांनी ‘लोकमत’ला दिली.
गटविकास अधिकारी, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांच्या मदतीने अवैध दारू व्यवसाय बंद करण्यात आले. खासगी डॉक्टरांची बैठक घेऊन यापुढे कोणत्याही रुग्णावर उपचार न करता, त्यांना सरकारी आरोग्य यंत्रणेकडे वळविण्याचे सक्त आदेश दिले. गावामध्ये सलग कोरोना चाचण्या हाती घेण्यात आल्या. चौदा दिवस विलगीकरण कक्षात रुग्णांची रवानगी केली, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती डॉ. घोगरे यांनी दिली.
----
लसीकरणापूर्वी चाचणीची सक्ती
वाकडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणापूर्वी चितळीच्या प्रत्येक नागरिकाची सक्तीने चाचणी करण्यात आली. गावातील ९० टक्के लोकसंख्येची चाचणी पूर्ण झाली आहे. लवकरच शंभर टक्के ग्रामस्थांची चाचणी होऊन गाव कोरोनामुक्त होईल, असा विश्वास डॉ. घोगरे यांनी व्यक्त केला.
---
मृत्यूचे तांडव
गावातील ज्येष्ठ नेते तसेच त्यांचे राजकीय विरोधक यांचे या लाटेत निधन झाले. एका सामाजिक कार्यकर्त्यासह त्याची पत्नी व स्नुषाही मृत्यूमुखी पडली. संपूर्ण कुटुंबावरच शोककळा पसरली. कोरोनाने गावातील ४० ज्येष्ठांना कुटुंबियांपासून हिरावून नेले. वयाच्या सत्तरीपुढील संपूर्ण पिढीचा या साथीने बळी घेतला.
---
चितळीत मागील महिन्यात अवैध दारूविरुद्ध चार ते पाच कारवाया केल्या. यात मुद्देमाल जप्त करण्यात आला.
- अशोक अडांगळे, हवालदार, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे
---