अहो ऐकलंत का? फक्त १०० रुपये द्या अन् आरोग्य प्रमाणपत्र मिळवा; अहमदनगरमधील प्रकार कॅमेऱ्यात कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 17:23 IST2020-06-02T16:38:19+5:302020-06-02T17:23:12+5:30
कोणतीही तपासणी नाही. चौकशीची कटकट नाही. फक्त नाव सांगा. १०० रुपये द्या आणि आरोग्य प्रमाणपत्र घेऊन जा, असा धक्कादायक कारभार महापालिकेच्या आरोग्य केंद्रात सुरु आहे. शहरातील मुकुंदनगरमधील आरोग्य केंद्रात सुरु असलेला हा प्रकार कॅमेºयात कैद झाला.

अहो ऐकलंत का? फक्त १०० रुपये द्या अन् आरोग्य प्रमाणपत्र मिळवा; अहमदनगरमधील प्रकार कॅमेऱ्यात कैद
अहमदनगर : कोणतीही तपासणी नाही. चौकशीची कटकट नाही. फक्त नाव सांगा. १०० रुपये द्या आणि आरोग्य प्रमाणपत्र घेऊन जा, असा धक्कादायक कारभार महापालिकेच्या आरोग्य केंद्रात सुरु आहे. शहरातील मुकुंदनगरमधील आरोग्य केंद्रात सुरु असलेला हा प्रकार कॅमेºयात कैद झाला.
कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराला कोणीही बळी पडू नये, यासाठी प्रत्येक व्यक्तीला एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात जाणण्यासाठी ई-पास देण्यात येत आहे. मात्र त्यासाठी लागणारे आरोग्य प्रमाणपत्र कोणतीही चाचणी न करता १०० रुपये घेऊन देण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. मात्र, याकडे जिल्हाधिकारी, महापालिकेच्या आयुक्तांचे दुर्लक्ष झाले आहे.
मंगळवारी (दि.२) दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास अहमदनगर महापालिकेच्या मुकुंदनगर येथील आरोग्य केंद्रात शब्बीर सय्यद हे आरोग्य तपासणी करुन प्रमाणपत्र घेण्यासाठी दाखल झाले. त्यांना मुंबई येथे जायचे होते. मात्र, आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी शब्बीर सय्यद यांची कोणतीही तपासणी न करता किंवा त्यांची काही आरोग्यविषयक चौकशी न करता फक्त नाव विचारले. कोठे जायचे आहे ते विचारले आणि छापिल प्रमाणपत्रावर शब्बीर सय्यद यांचे पूर्ण नाव टाकून प्रमाणपत्र त्यांच्या हातात टेकवले. हे प्रमाणपत्र देताना १०० रुपयांची मागणी केली. सय्यद यांनी संबंधित कर्मचा-याकडे १०० रुपये दिले आणि प्रमाणपत्र घेतले. कोरोनासारख्या महामारीतही आरोग्य यंत्रणा पैसे घेऊन नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा हा प्रकार कॅमे-यात कैद झाला.
मी आज (मंगळवारी) आरोग्य तपासणीसाठी मुकुंदनगरमधील आरोग्य केंद्रात गेलो होतो. मात्र, माझी त्यांनी काहीही तपासणी केली नाही. इन्फ्रारेड थर्मामीटरद्वारे साधा तापही तपासला नाही. फक्त नाव विचारले आणि १०० रुपये घेऊन प्रमाणपत्र दिले आहे. हे धोकादायक आहे.
-शब्बीर सय्यद