सहकारमंत्री जिल्हा बँकांच्या भरतीची माहिती घेणार; सहकार आयुक्तालयातच घोटाळ्याचे मूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 22:12 IST2025-01-07T22:12:30+5:302025-01-07T22:12:50+5:30

ऑनलाइन भरतीतही घोटाळा, या कंपनीबाबत खासदार निलेश लंके, माजी आमदार प्राजक्त तनपुरे, टिळक भोस यांनी सरकारकडे तक्रारी केल्या आहेत. मंत्रालयाने सहकार आयुक्तालयाला चौकशी करण्यास सांगितले. :

Cooperative Minister will inquire about the recruitment of district banks; The root of the scam is in the Cooperative Commissionerate itself | सहकारमंत्री जिल्हा बँकांच्या भरतीची माहिती घेणार; सहकार आयुक्तालयातच घोटाळ्याचे मूळ

सहकारमंत्री जिल्हा बँकांच्या भरतीची माहिती घेणार; सहकार आयुक्तालयातच घोटाळ्याचे मूळ

अहिल्यानगर : अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हा सहकारी बँक व एकूणच जिल्हा बँकांच्या भरतीत काय सुरू आहे याची आपणाला माहिती नाही. याबाबत तपशील जाणून घेऊ, अशी प्रतिक्रिया सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

राज्याच्या सहकार आयुक्तालयाने जिल्हा बँंक भरती प्रक्रियेतील घोटाळे थांबविण्यासाठी ही प्रक्रिया ऑफलाइनऐवजी ऑनलाइन करण्याचे धोरण घेत यासाठी सहा कंपन्यांचे पॅनल गठित केले. मात्र, या पॅनलमध्येच घोटाळा असून, अनुभवाची बोगस प्रमाणपत्रे सादर करून वर्क वेल इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पॅनलमध्ये समाविष्ट झाली असल्याचे पुरावेच ‘लोकमत’ने उजेडात आणले आहेत. विशेष म्हणजे नामांकित कंपन्यांऐवजी हीच कंपनी बँंकांची लाडकी बनली असून, बँका तिलाच काम देत आहेत. नगर जिल्हा बँंकेने आपल्या ७०० पदांच्या भरतीचे काम या कंपनीला दिले आहे. या कंपनीबाबत खासदार नीलेश लंके, माजी आमदार प्राजक्त तनपुरे, टिळक भोस यांनी सरकारकडे तक्रारी केल्या आहेत. मंत्रालयाने सहकार आयुक्तालयाला चौकशी करण्यास सांगितले. मात्र, सहकार आयुक्तालयाने अनुभव प्रमाणपत्रांची खातरजमा न करता गोलमाल उत्तरे देत कंपनीला पाठीशी घातले आहे. या कंपनीचे प्रमुख अमरावतीचे आहेत.

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी ‘लोकमत’ने याबाबत संपर्क केला असता ते म्हणाले, या प्रकरणाचा तपशील आपणाला माहीत नाही. याबाबत माहिती घेऊ. सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता आपण सहकार विभागाच्या राष्ट्रीय परिषदेत असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकचे सहनिबंधक संभाजी निकम म्हणाले, कंपनीची निवड आयुक्तालयातून झाली आहे. त्यामुळे यासंदर्भात आपणाकडे काहीही माहिती नाही.

उमेदवार हवालदिल, राजकीय पक्षांचे मौन

अहमदनगर जिल्हा बँंकेच्या नोकर भरतीत हजारो मुलांनी अर्ज केले आहेत. वर्क वेल कंपनीने परीक्षा अहिल्यानगर जिल्ह्याऐवजी पुणे जिल्ह्यात ठेवली आहे. परीक्षा पुणे जिल्ह्यात का?, याबाबत बँंक व कंपनी यापैकी कुणीही स्पष्टीकरण दिलेले नाही. उमेदवारांना परीक्षेसाठी पुण्यात जावे लागणार आहे. राजकीय पक्षांनीही याबाबत मौन बाळगले आहे.

कंपनी बोगस आढळल्यास पैसे पाण्यात जाणार

कंपनीची चुकीच्या पद्धतीने पॅनलवर नियुक्ती झाल्याने याबाबत पेच निर्माण झाला आहे. कंपनीची निवड कोणत्याही टप्प्यावर अडचणीत येऊ शकते. परीक्षा रद्द झाल्यास मुलांचे परीक्षेसाठीचे पैसे, श्रम वाया जाण्याची शक्यता आहे. राज्यभर हा घोळ होण्याची शक्यता आहे.

नियुक्तीसाठी भाव फुटले?

जिल्हा बँकेत भरती होण्यासाठी निवडीचा भाव काय, याची चर्चा सुरू झाली आहे. काही दलाल आमिष दाखवत असल्याचीही चर्चा आहे. भरतीच्या नावाने कुणी पैसे मागत असेल तर उमेदवारांनी काय खबरदारी घ्यावी, भरती पारदर्शक कशी होणार, याबाबत बँकेचे प्रशासन, संचालक, भरती करणारी कंपनी यापैकी कुणीही जनजागरण करताना अथवा पत्रकार परिषद घेताना दिसत नाही.

Web Title: Cooperative Minister will inquire about the recruitment of district banks; The root of the scam is in the Cooperative Commissionerate itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.