काँग्रेसला मोदी लाटेचा धसका

By Admin | Updated: June 12, 2014 00:10 IST2014-06-11T23:48:12+5:302014-06-12T00:10:46+5:30

मतविभागणी पथ्यावर : महायुतीचे कडवे आव्हान

Congress wins Modi wave | काँग्रेसला मोदी लाटेचा धसका

काँग्रेसला मोदी लाटेचा धसका

मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूर
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना सर्वाधिक १ लाखांहून अधिक मते देणाऱ्या श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात सत्ताधारी काँग्रेससमोर महायुतीने कडवे आव्हान आहे.
काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे या मतदार संघाचे प्रथमच प्रतिनिधीत्व करीत आहेत. २००९ पासून हा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव होऊन राहुरीच्या देवळाली जि. प. गटातील ३२ गावेही यात समाविष्ट झाली. यापूर्वी काँग्रेसकडून जयंत ससाणे सलग दोनदा निवडून आले आहेत. कांबळेंच्या रूपाने राखीव प्रवर्गातील व्यक्ती जरी श्रीरामपूरची आमदार असली तरी सारी सूत्रे ससाणेंच्याच हाती आहेत. श्रीरामपूर शहरावरील पकड तसेच १० वर्षांच्या आमदारकीच्या काळात ग्रामीणमध्ये निर्माण केलेल्या फळीच्या जोरावर तालुका काँग्रेसमय ठेवण्यात ससाणे यशस्वी ठरले. कांबळे आता पुन्हा इच्छूक आहेत.
लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला येथून ५० हजारांहून अधिक मताधिक्य मिळाल्याने काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यास धक्का बसला. काँग्रेसकडे सध्या तरी कांबळेच प्रबळ दावेदार आहेत. ससाणेंचे स्वीय सहायक सुभाष तोरणेही तयारीत आहेत. तर महायुतीकडे लहू कानडे व भाऊसाहेब डोळस इच्छूक आहेत. राष्ट्रवादीचे नेते भानुदास मुरकुटे माजी सभापती सुनीता गायकवाड यांना शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यास महायुतीमध्ये विरोध आहे. सेनेची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष उमेदवार उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ‘आप’ कोणालाही आपली वाटत नाही. स्वाभीमानी शेतकरी संघटना आंदोलनापुरती दिसते. रिपाइंचे अस्तित्व असले तरी गटतटात विखुरल्याने त्यांचा इतरांनाच फायदा होतो. त्यांच्याकडेही भक्कम उमेदवार नाही. सर्वाधिक मतदार असलेल्या श्रीरामपूर शहरावर ससाणेंची पकड आहे. महायुतीस पोषक वातावरण असले तरी भाजपही शिवसेनेच्या या जागेवर हक्क सांगू लागला आहे.
नेत्यांविषयीच साशंकता
राष्ट्रवादीचे भानुदास मुरकुटे भाजपच्या तिकिटावर नेवाशातून, काँग्रेसचे ससाणे शिर्डीतून, भाजपचे प्रकाश चित्ते नेवाशातून लढण्याच्या तयारीत आहेत. चित्ते सोडल्यास मुरकुटे-ससाणे काँग्रेस सोडून महायुतीत जाण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांमध्ये आपल्या नेत्यांविषयीच साशंकता आहे.
मतविभागणीवर कांबळे आमदार
गेल्या निवडणुकीत युतीचे भाऊसाहेब डोळस व मुरकुटेंचे अपक्ष विजय शिंदे, रिपाइंचे राजाभाऊ कापसे यांच्यातील मतविभागणीमुळे काँग्रेसचे कांबळे आमदार झाले. आता मतविभागणी टळली तरच महायुतीस संधी मिळेल, अन्यथा काँग्रेससाठी यशाचा मार्ग अधिक सुकर होईल, अशी शक्यता आहे.
काँग्रेसभाऊसाहेब कांबळे ५९८१९
शिवसेनाभाऊसाहेब डोळस ३८९२२
अपक्षविजय शिंदे २०२३७
इच्छुकांचे नाव पक्ष
भाऊसाहेब कांबळे काँग्रेस
सुभाष तोरणे काँग्रेस
लहू कानडे शिवसेना
सुनीता गायकवाड शिवसेना
लोकसभा निवडणुकीत
सदाशिव लोखंडे यांना ५२ हजारांचे मताधिक्य

Web Title: Congress wins Modi wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.