काँग्रेसकडे प्रचाराचा मुद्दाच नाही-भाऊसाहेब कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:28 IST2019-10-18T12:27:27+5:302019-10-18T12:28:57+5:30
गेली दहा वर्षे आमदार असताना माझे शिक्षण विरोधकांना दिसले नाही. त्यांच्याकडे प्रचारात कोणताच मुद्दा नसल्याने ते शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करीत आहेत. एकप्रकारे माझ्या गरिबीची व आर्थिक परिस्थितीची ते थट्टा करत आहेत, अशी टीका शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी केली.

काँग्रेसकडे प्रचाराचा मुद्दाच नाही-भाऊसाहेब कांबळे
श्रीरामपूर : गेली दहा वर्षे आमदार असताना माझे शिक्षण विरोधकांना दिसले नाही. त्यांच्याकडे प्रचारात कोणताच मुद्दा नसल्याने ते शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करीत आहेत. एकप्रकारे माझ्या गरिबीची व आर्थिक परिस्थितीची ते थट्टा करत आहेत, अशी टीका शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी केली.
श्रीरामपूर शहरातील नगरसेवक शामलिंग शिंदे, जयश्री शेळके,राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, स्नेहल खोरे या नगरसेवकांच्या प्रभागात झालेल्या चौक सभेत कांबळे बोलत होते. यावेळी मुळा प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडधे, डॉ. महेश क्षीरसागर, अशोक थोरे, अरुण पाटील, निखिल पवार, अक्षय वर्पे, विशाल यादव, रमेश घुले, संजय पाटील, अॅड.अरुण लबडे उपस्थित होते.
कांबळे म्हणाले, विरोधकांच्या गटात होतो तेव्हा आपण चाललो. मात्र त्यांची साथ सोडल्याने माझ्या शिक्षणाचा साक्षात्कार झाला. विरोधकांकडे विधायक व विकासाचे मुद्दे नसल्यानेच ते आता वैैयक्तिक टीका करत आहेत. ज्यांची हयात सनदी अधिकारी म्हणून गेली. ज्यांचा समाजकारणाशी व जनतेशी दुरान्वये संबंध नाही. ते काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे यांना इतरांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. आपण गेली पंचवीस वर्षे राजकीय व सामाजिक क्षेत्रात आहोत. काँग्रेसच्या उमेदवाराकडे कोणतेही मुद्दे वा विकासाचा कार्यक्रम नाही. माझ्याकडे श्रीरामपूरच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार आहे, असे कानडे म्हणतात.मग त्यांनी ती आताच जनतेसमोर मांडावी.
मी स्व. जयंत ससाणे यांच्याशी गद्दारी केलेली नाही. ससाणेंच्या अवतीभवती कोंडाळे करणा-या कंपूने मला बाहेरचा रस्ता दाखवला. आता तेच मी गद्दारी केल्याचे म्हणत आहेत. कानडे यांनी स्वत: निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व शिवसेना अशा दोन ठिकाणी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. तिकीट मिळत नाही, असे स्पष्ट होताच शिवसेनेतून उडी मारुन काँग्रेसच्या डेरेदाखल झाले.