श्रीगोंद्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:16 IST2021-07-16T04:16:04+5:302021-07-16T04:16:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क श्रीगोंदा : येथील ग्रामीण रुग्णालयांतर्गत येणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर सकाळी ११ वाजता लस संपल्याचे जाहीर ...

श्रीगोंद्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर गोंधळ
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीगोंदा : येथील ग्रामीण रुग्णालयांतर्गत येणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर सकाळी ११ वाजता लस संपल्याचे जाहीर करताच गोंधळ उडाला. लस संपल्याचे सांगताना व नागरिकांची समजूत घालताना येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. सध्या लसीचे डोस कमी अन् मागणी अधिक अशी स्थिती आहे. लसीचे डोस कमी येत असल्याने अनेक नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागते.
तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस ५५ हजार नागरिकांना दिला गेला असून दुसरा डोस अवघ्या १२ हजार नागरिकांनाच मिळाला आहे. सध्या लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक उत्सुक आहेत. मात्र त्या प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गोंधळमय परिस्थिती पाहावयास मिळते. गुरुवारी श्रीगोंदा शहरातील केंद्रावर सकाळी ११ वाजता लस संपल्याचे जाहीर करण्यात आले. त्यावर एकच गोंधळ उडाला होता.
तालुक्यात सात प्राथमिक आरोग्य केंद्र तर एक ग्रामीण रुग्णालय आहे. श्रीगोंदा शहर, लोणी व्यंकनाथ, मांडवगण, आढळगाव, काष्टी, बेलवंडी, पिंपळगाव पिसा, कोळगाव ही केंद्र लसीकरणाच्या टक्केवारीत पुढे आहेत.
मात्र इतर गावात लसीकरणाची टक्केवारी थोडीशी कमी दिसत आहे.
आरोग्य विभागाने गावाची लोकसंख्या, लसीकरणाचे प्रमाण यांची आकडेवारी काढून लसीकरणाची टक्केवारी कमी असलेल्या गावांना लस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रावर लस आली की गर्दी होते. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावोगाव लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.
----
ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य
कोरोना प्रतिबंधक लस घेताना ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना टोकन दाखविले की थेट लस देण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. रांगेत उभे राहून ज्येष्ठ नागरिकांचे हाल होतात.
----
लसीकरणाच्या कार्यक्रमात सुसूत्रता राखली जात आहे. मात्र काही वेळा लस उशिरा मिळते. कमी डोस असतात. त्यामुळे थोडा गोंधळ होतो. अशा परिस्थितीत आरोग्य विभागातील कर्मचारी लस देण्याचे काम करतात.
-नितीन खामकर,
तालुका आरोग्य अधिकारी, श्रीगोंदा.
-----
लसीसाठी नागरिक पहाटेपासून रांगा लावतात. मात्र लसीचे डोस कमी येतात. त्यामुळे गोंधळ होतो. लसीचे डोस वाढवून श्रीगोंदा शहरात दोन लसीकरण केंद्र सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे गर्दी आणि गोंधळ कमी होईल.
-भारती इंगवले,
तालुकाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड, श्रीगोंदा
----
१५ श्रीगोंदा कोरोना
श्रीगोंदा कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर गुरुवारी सकाळी उडालेला गोंधळ.