वीजमीटरचे रीडिंग घेणाऱ्या एजन्सीजकडून घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:30 IST2021-02-05T06:30:29+5:302021-02-05T06:30:29+5:30
एकीकडे महावितरणचा कारभार पारदर्शी होत असताना दुसरीकडे मात्र, खासगी एजन्सीच्या चुकीच्या कामांमुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे. ...

वीजमीटरचे रीडिंग घेणाऱ्या एजन्सीजकडून घोळ
एकीकडे महावितरणचा कारभार पारदर्शी होत असताना दुसरीकडे मात्र, खासगी एजन्सीच्या चुकीच्या कामांमुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे. बिल जास्त आल्याने ग्राहक व महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांच्यात वाद होत आहेत. जास्त बिल आल्याने ग्राहकांचा रोष महावितरण कंपनीवरच आहे. खासगी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुका सुधारण्यासाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांची डोकदुखी वाढली आहे. अनेक ग्राहकांकडे साधे मोबाइल असल्याने त्यांना महावितरणचे ॲप वापरता येत नाही. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जास्त रीडिंग आलेल्या अथवा वाढीव वीजबिल आलेल्या ग्राहकांच्या घरी, दुकानात जाऊन पुन्हा मीटरचे रीडिंग घ्यावे लागते. त्याची नोंद या ॲपवर करावी लागते.
वाढीव वीजबिल कमी केल्यानंतरही पुढील बिलात वाढीव रक्कम लागून येत असल्याने, ग्राहकांना ते कमी करण्यासाठी महावितरण कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वीजमीटरचे रीडिंग घेणाऱ्या खासगी एजन्सीजच्या घोळामुळे हे घडत असल्याने, वीज ग्राहकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कोट
आधीच्या एजन्सीजबाबत अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांचे रीडिंग घेणाचे काम बंद केले आहे. दुसऱ्या एजन्सीला हे काम दिले आहे. ग्राहकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी यांच्यांशी संपर्क साधावा.
- सचिन भांगरे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, संगमनेर
कोट
अनेकदा मीटर रीडिंग न घेता अंदाजे युनिट लावण्यात येतात. त्यामुळे ग्राहकांना याचा फटका बसून त्यांचे आर्थिक नुकसान होते. हा प्रकार फारच गंभीर आहे.
- शिरीष मुळे, जिल्हाध्यक्ष, भाजप, व्यापारी सेल