२१ हजार गणेश मूर्तींचा संकल्प पूर्णत्वास
By Admin | Updated: August 24, 2014 23:08 IST2014-08-24T22:56:31+5:302014-08-24T23:08:06+5:30
अहमदनगर : कलाजगत न्यासच्या ‘गो फॉर ग्रीन गणेश’ उपक्रमातंर्गत आपला गणपती आपणच बनवू या कार्यशाळेतून २१ हजार गणेश मूर्ती बनविण्याचा संकल्प रविवारी पूर्ण झाला़

२१ हजार गणेश मूर्तींचा संकल्प पूर्णत्वास
अहमदनगर : कलाजगत न्यासच्या ‘गो फॉर ग्रीन गणेश’ उपक्रमातंर्गत आपला गणपती आपणच बनवू या कार्यशाळेतून २१ हजार गणेश मूर्ती बनविण्याचा संकल्प रविवारी पूर्ण झाला़ रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत अडीच हजार मुलांनी सहभाग घेत मूर्ती तयार केल्या.
कलाजगत न्यासचे प्रमुख शिल्पकार प्रमोद कांबळे यांचे प्रात्यक्षिक पाहून मूर्ती बनविण्यात आल्या़ जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याहस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले़ या कार्यशाळेत शहरासह नगर तालुक्यातील १७३ विद्यालयातील विद्यार्थी, त्यांचे पालक व विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते़
कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना शास्त्रीय पद्धतीने भिजविलेली शाडू माती देण्यात आली़ शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी उपस्थितांना अतिशय कलात्मक पद्धतीने टप्याटप्प्याने मूर्ती बनविण्याची कला शिकविली़ मातीच्या गोळ्यावर मूर्ती कोरताना प्रत्येकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता़ दोन तासांच्या मेहनतीनंतर मातीच्या गोळ्यातून आकार घेतलेल्या मूर्तीकडे पाहून अनेक बालगोपाळांचा आनंद गगनात मावेना़ शहरात दरवर्षी अशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे, असे मत सहभागी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी व्यक्त केले़
प्रमोद कांबळे यांनी मागील १५ दिवसांत राज्यात विविध जिल्ह्यात कार्यशाळा घेऊन मूर्ती बनविण्याचा उपक्रम राबविला़ आतापर्यंत १९ हजार मूर्ती कार्यशाळेच्या माध्यमातून तयार झाल्या होत्या़ रविवारी झालेल्या कार्यशाळेत अडीच हजार मूर्ती बनविण्यात आल्याने कांबळे यांचा २१ हजार मूर्ती बनविण्याचा संकल्प पूर्ण झाला़
कार्यशाळेत शहरातील जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी होऊन पर्यावरणपूरक मूर्ती बनवावी, यासाठी प्रमोद कांबळे, अमोल बागूल यांच्यासह कलाजगतच्या सदस्यांनी जनजागृती केली होती़ (प्रतिनिधी)
भक्तीबरोबर कलानिर्मितीचा आनंद
मातीपासून बनविलेल्या गणपतीची घरी प्रतिष्ठापना करून विसर्जनदिनी घरीच बादलीत त्याचे विसर्जन करता येणार आहे़ तसेच ही माती बगीचासाठी वापरता येईल़ यातून भक्तीबरोबर कलानिर्मितीचा आनंद घेत पर्यावरणाचे रक्षण होणार आहे़ प्लॅस्टर आॅफ पॅरिस व रासायनिक घटकांना पायबंद बसेल़ - प्रमोद कांबळे, शिल्पकार